तैवान येथे झालेल्या माहितिशास्त्रावरील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये दिल्ली येथील शाळेचा विद्यार्थी अक्षत बुबना याने सुवर्णपदक पटकावले. माहितिशास्त्रावरील स्पर्धेत अशी कामगिरी करणारा अक्षत हा पहिला भारतीय विद्यार्थी आहे.
१८ वर्षीय अक्षत अ‍ॅमिटी आंतरराष्ट्रीय स्कूलमधून बारावीच्या सीबीएसई बोर्डाची परीक्षा ९६ टक्के मिळवून उत्तीर्ण झाला आहे. गणित आणि संगणकशास्त्र या दोन विषयांतील पदवी संपादन करण्यासाठी ‘मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे शिक्षणासाठी जाणार आहे. गुरुवारी तो अमेरिकेसाठी रवाना होईल. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे गेल्या वर्षी झालेल्या माहितिशास्त्रातील ऑलिम्पियाडमध्ये अक्षतने कांस्यपदक मिळवले होते. ऑलिम्पियाडमधील हे त्याचे दुसरे पदक आहे.
मुंबईतील चषक गुरुकुलमध्ये शिकत असलेल्या मालविका जोशी हिच्यासह इतर अन्य भारतीय विद्यार्थ्यांनी यंदाच्या ऑलिम्पियाडमध्ये चांगली कामगिरी केली. मालविका हिने या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय विद्यार्थिनी ठरली, तर कांस्यपदक पटकावणाऱ्या विविध देशांतील विद्यार्थ्यांमध्ये भारताचा पुष्कर मिश्रा याचीही कामगिरी उल्लेखनीय होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या पाच विज्ञान ऑलिम्पियाडमधील माहितिशास्त्र ही एक ऑलिम्पियाड आहे.

गेल्या वर्षी ऑलिम्पियाडमधील कांस्यपदकाने मला बरेच काही दिले. त्यानंतर मी मॅसाच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. आता त्यानंतर मला यात सुवर्णपदक मिळाले. याआधीच्या स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा लाभ मला झाला. त्या अनुषंगानेच आम्ही तयारी केली.
अक्षत बुबना, ऑलिम्पियाड सुवर्णपदकविजेता