दिल्ली मंत्रिमंडळाचा निर्णय
दिल्ली अँड डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशनमधील (डीडीसीए) कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी माजी महाधिवक्ता गोपाळ सुब्रह्मण्यम यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय आयोग नेमण्याचा निर्णय दिल्ली मंत्रिमंडळाने घेतला आहे. डीडीसीए व दिल्ली सचिवालयात सीबीआयने टाकलेल्या छाप्यांची चर्चा करण्यासाठी दिल्ली विधानसभेचे खास अधिवेशन उद्या बोलावण्यात आले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली.
दिल्ली मंत्रिमंडळाने डीडीसीए घोटाळा व दिल्ली सचिवालयातील सीबीआय छाप्यांच्या प्रकरणी चौकशी आयोग नेमण्यास मंजुरी दिली आहे व उद्यापासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटरवर म्हटले आहे. आम आदमी पक्षाने केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर डीडीसीए प्रकरणी दोषारोप केले आहेत. जेटली हे डीडीसीएचे प्रमुख असताना त्यात गैरव्यवहार झाल्याचे हे आरोप असून जेटली यांनी हे आरोप फेटाळले आहेत.
डीडीसीए प्रकरणी चौकशी आयोग नेमण्याचा ठराव विधासभेत संमत केला जाईल असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले.
दिल्लीत अलीकडेच केजरीवाल यांचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या सचिवालयावर छापे टाकण्यात आले होते त्यावर आपने (आम आदमी पक्षाने) असा दावा केला की, सीबीआयने हे छापे केजरीवाल यांना लक्ष्य करण्यासाठी टाकले व ते डीडीसीए प्रकरणातील गैरप्रकारांच्या फाईल्स शोधत होते. तेव्हापासून आम आदमी पक्षाने जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi cabinet to set up commission to probe ddca scam
First published on: 22-12-2015 at 02:07 IST