दिल्लीनं आपल्या सर्व सीमा बंद करण्याची करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. यादरम्यान, केवळ अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाच आणि व्यक्तींना बाहेर जाण्याची किंवा आत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच केजरीवाल यांनी दोन मुद्द्यांवर दिल्लीकरांकडून सूचनाही मागवल्या आहेत. दिल्लीची सीमा बंद ठेवावी का ? आणि दुसऱ्या राज्यांच्या रुग्णांना दिल्लीत उपचारासाठी येऊ द्यावं का? यासंदर्भात केजरीवाल यांनी दिल्लीकरांचं मत जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच आतापर्यंत ज्या गोष्टींमध्ये सुट देण्यात आली होती ती तशीच राहणार असून अन्य सलून आणि अन्य ठिकाणंही हळहळू उघडण्यात येणार आहेत.

“दिल्लीत करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढता आहे. ही चिंतेची बाब असली तरी घाबरण्याचं कारण नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारनं रुग्णालयांवर अधिक खर्च केला आहे. जगभरातील आरोग्य सेवा कोलमडल्या आहेत. पण अशावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री बेड उपलब्ध असल्याचं सांगत आहे. रुग्णांसाठी बेडची सुविधा करण्यात आली आहे. दिल्लीत २१०० रुग्ण आहेत असं मी तीन चार दिवसांपूर्वी सांगितलं होतं. परंतु आपल्याकडे ६ हजार ६०० बेड्स उपलब्ध आहेत,” असं ते म्हणाले. लवकरच या बेड्सची संख्या वाढून ९ हजार ५०० करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

“दिल्लीची सीमा खुली केली तर रुग्ण उपचारासाठी दिल्लीत येतील. दिल्लीत आरोग्य सेवा उत्तम आहे आणि सर्व काही मोफत आहेत, यासाठी लोक दिल्लीत येत असतात. सीमा खुल्या केल्यास दिल्लीत ठेवण्यात आलेले ७ हजार ५०० बेड्स हे दोन दिवसांमध्ये भरून जातील. अशात आपल्याला काय करायला हवं?” असा सवाल केजरीवालांनी दिल्लीकरांना विचारला आहे.

आजपासून अधिक सुट

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यात देण्यात येणारी सुट अधिक वाढवली आहे. राज्यातील सलूनही उघडली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. परंतु राज्यातील स्पा मात्र उघडण्यास बंदी असेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. याव्यतिरिक्त रिक्षा आणि ई-रिक्षांमध्ये एका प्रवाशाच्या प्रवासाची ठेवण्यात आलेली अटही आता हटवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील सर्व दुकानं ऑड आणि इव्हन तत्वावर उघडण्याची परवानगीही देण्यात आली आहे. तसंच दुचाकी आणि चारचाकीमधील प्रवासासाठीही घालून देण्यात आलेले निर्बंध हटवण्यात आले असून औद्योगिक क्षेत्रही खुलं करणार असल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं.