बॉलिवूड आणि राजकारण सुरुवातीपासूनच जवळचे नाते आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्री एखाद्या पक्षात सामील होणे किंवा नव्याने पक्ष स्थापन करणे हे आता नवीन नाही. नुकतीच सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश केला असताना आता अभिनेता कमल हसनही आपला पक्ष स्थापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. उद्या म्हणजेच २१ फेब्रुवारी रोजी याची अधिकृत घोषणा होणार आहे. उद्याचा कार्यक्रम मदुराई येथे होणार असून यामध्ये हसन पक्षाचे नाव आणि त्याच्या झेंड्याची घोषणा करणार आहेत. यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या पक्षस्थापनेच्या कार्यक्रमात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.

केजरीवाल आणि कमल हसन यांची साधारण वर्षभरापूर्वी भेट झाली होती. त्यानंतर हसन यांची केजरीवाल यांच्यासोबत काहीशी जवळीक झाल्याची चर्चा होती. पक्ष स्थापन करण्यापूर्वी कमल हसन नुकतेच आपले अभिनयाच्या क्षेत्रातील मित्र सुपरस्टार रजनीकांत यांनी भेटले. याबरोबरच विजयकांत आणि एम. करुणानिधी यांचीही त्यांनी भेट घेतली. तामिळनाडूतील विधानसभा निवडणूकीला आणखी बराच वेळ असताना येथील राजकीय वातावरण आतापासूनच तापल्याचे चित्र आहे. तामिळनाडूतील दोन सुपरस्टार राजकारणात स्वतःचा पक्ष स्थापन करुन प्रवेश करत असल्याने येथील राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रजनीकांत यांच्या पक्षावर केशरी रंगाचा म्हणजेच भाजपाचा जास्त प्रभाव दिसून येत असल्याचे सूचक वक्तव्य हसन यांनी केले. ‘रजनीच्या राजकीय कारकिर्दीवर केशरी रंगाचा जास्त प्रभाव दिसून येत असून, ही परिस्थिती अशीच राहिली तर मी त्याच्यासोबत युती करणार नाही’, असे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. रजनीकांत आणि आपल्यामध्ये खूप चांगली मैत्री असून, राजकारण आणि मैत्री या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पण आता रजनीकांत यांच्या विरोधात कमल हसन राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने एकूण तामिळनाडूचे राजकारण नेमके काय वळण घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्याबरोबरच केजरीवाल यांची कमल हसन यांच्या पक्षस्थापनेला असणारी उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.