करोना काळात विविध राज्यांच्या सरकारने करोनाशी लढण्यासाठी स्वयंसेवकांची मदत घेतली आहे. अनेक नागरिकांनी स्वत: पुढे येत मदत केली आहे. देशात अनेक स्वयंसेवक दिवसरात्र करोनाग्रस्तांची तसेच करोनामुळे अडलेल्या-नडलेल्यांना मदत करत आहेत. त्यापैकी एक होते दिल्लीचे नागरी संरक्षण स्वयंसेवक अरुण सिंग… सुमारे तीन महिने त्यांनी गरीब व गरजुंना मदत केली पण अखेर करोनाने त्यांच्यावरच काळाचा घाला घातला.

तीन महिन्यांच्या जास्त काळ करोनाग्रस्त तसेच अडकलेल्या मजूरवर्गाला अन्नधान्य व जेवण पुरवणारे अरूण सिंग यांचे सोमवारी (१३ जुलै) निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. महिन्याच्या सुरूवातीला अरूण सिंग यांची करोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे ४ जुलैला त्यांना द्वारका विभागातील वेंकटश्वर रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सोमवारी रात्री साडेनऊच्या आसपास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

२० एप्रिल रोजी दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी द्वारका येथील सेक्टर २५ मध्ये अडकलेल्या एक हजारांपेक्षा जास्त मजुरांच्या जेवणाची व्यवस्था अरूण सिंग यांनी अतिशय कमी वेळात एकहाती केली होती. दिल्लीच्या कोविड रिस्पॉन्स सिस्टमचा आधार असलेल्या हजारो स्वयंसेवकांपैकी ते एक होते.

गेल्या काही महिन्यांपासून अरूण सिंग यांचे मदतकार्य सुरू होते. अन्नधान्याची व जेवणाची पाकिटे पुरवताना ते योग्य ती काळजी घेत होते. पण तरीदेखील करोनाने त्यांना गाठलंच. त्यांच्या मुलगा नववीत आहे तर मुलीने बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिली होती. पण त्या परिक्षेचा सोमवारी निकाल आल्यानंतर तो आनंद सिंग कुटुंबाला एकत्र साजरा करता आला नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ‘इंडियन एक्सप्रेस’मधील बातमीचा फोटो ट्विट करत अरूण सिंग यांच्या कार्याला सलाम केला.

“तो आमच्या सर्वात मौल्यवान कर्मचार्‍यांपैकी एक होता. त्याने प्रामाणिकपणे साऱ्यांची मदत केली. खरं सांगायचं तर त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. आम्ही सोपवलेली प्रत्येक कामे सिंग यांनी पार पाडली. भुकेलेल्या अन्नाचे वितरण करायचे असो किंवा कंटेन्टमेंट झोनमध्ये काम करायचे असो; त्याने कायम तयारी दर्शवली. सिंग यांच्या निधन हे माझ्या दृष्टीने माझे वैयक्तिक नुकसान आहे”, अशा भावना उपविभागीय दंडाधिकारी (द्वारका) चंद्रशेखर यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केल्या.