News Flash

दिल्लीत सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर

दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.

संग्रहित (PTI)

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. तसेच रुग्णांची संख्या दिवासागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे करोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारनं सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्रीपासून (१९ एप्रिल) ते २६ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू असतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना ही माहिती दिली. अरविंद केजरीवाल यांनी राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत चर्चा करुन सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे.

“आम्ही चाचण्या कमी केल्या नाहीत तर वाढवल्या. दिल्लीत रोज १ लाख चाचण्या होत आहे. आम्ही मृत्यूचे आकडेही लपवले नाहीत. आम्ही आत्तापर्यंत कधीही खोटं बोललो नाही. जी परिस्थिती आहे ती नेहमीच जनतेसमोर ठेवली. दिल्लीत गेल्या २४ तासात २३ हजार ५०० रुग्ण आढळले आहेत. दिवसाला २५ हजार रुग्ण मिळत असतील तर आरोग्य व्यवस्था ढासळेल. दिल्लीत १०० पेक्षी कमी आयसीयू बेड आहेत. ऑक्सिजनसाठी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. एका खासगी रुग्णालयाने तर रात्री तीन वाजता ऑक्सिजन संपला होता असं सांगितलं. मात्र वेळीच उपलब्ध झाल्याने खूप मोठी दुर्घटना टळली. औषधांचा तुटवडा जाणवत आहे. या सर्व गोष्टी पाहता दिल्लीमध्ये परिस्थिती गंभीर आहे.,” असं केजरीवीलांनी म्हटलं.

“दिल्लीमध्ये आतापर्यंत आपण परिस्थिती चांगली हाताळली आहे. दिल्लीतील आरोग्य व्यवस्था सध्या सीमेवर आहे. कोणत्याही यंत्रणेच्या आपल्या मर्यादा आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.

“दिल्लीमध्ये आणखी रुग्णांना दाखल करून घेणं शक्य नाही आणि लॉकडाउनला पर्याय नाही असं लक्षात आलं आहे. आज रात्री दहा ते पुढील सोमवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाउन राहणार आहे. यावेळी मेडिकल, खाण्यापिण्याची दुकानं सुरू राहतील. काय सुरू राहणार व काय बंद यासंबंधी सविस्तर माहिती लवकरच जाहीर करू,” असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करताना अत्यावश्यक सेवा सुरु राहतील अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली. तसंच लग्नासाठी फक्त ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असून त्यासाठी पास दिले जातील असं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी सहा दिवसांचा लॉकडाउन आहे त्यामुळे कोणीही दिल्ली सोडून जाऊ नका. आम्ही तुमची काळजी घेऊ असं आश्वासन दिलं. तसंच हा लॉकाडउन वाढवण्याची गरज भासू नये अशी अपेक्षाही व्यक्त केली.

“माझ्यावर विश्वास ठेवा हा लॉकडाउन नाइलाजानं करावा लागत आहे. कुणीही दिल्ली सोडू नका, विश्वास आहे की लॉकडाउन वाढवायला लागणार नाही. रुग्णांची संख्या कमी होईल अशी आशा आहे. या सहा दिवसात आणखी मोठ्या प्रमाणात बेड वाढवू. केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. लॉकडाउनच्या काळात आम्ही ऑक्सिजनची औषधांची बेड्सची व्यवस्था करू,” असं केजरीवाल यांनी सांगितलं.

“हा निर्णय अत्यंत दु:खानं घ्यायला लागत आहे. आपलं दिल्ली एक कुटुंब आहे. कुटुंबावर संकट आलं की सगळे मिळून त्याचा सामना करतात. आताही आपण सर्व मिळून याचा सामना करु,” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 12:25 pm

Web Title: delhi cm arvind kejariwal announce lockdown sgy 87
Next Stories
1 देशभरात लॉकडाउन होणार का?; अमित शाहांचं मोठं विधान
2 करोना रुग्णसंख्येचा विस्फोट; तीन लाखांकडे वाटचाल…. मृत्यू संख्येत मोठी वाढ
3 करोना काळात प्राण गमावणाऱ्या आरोग्य योद्ध्याचं विमा छत्र मोदी सरकारनं काढलं
Just Now!
X