स्वातंत्र्य दिवस आणि रक्षबंधनाचे औचित्य साधत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील सर्व महिलांना बस प्रवास मोफत करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता परंतु तारखेची घोषणा करण्यात आली नव्हती. आता 29 ऑक्टोबरपासून महिलांना बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. दरम्यान, मेट्रोमध्येही महिलांना मोफत प्रवास करण्याची मुभा देण्याची मागणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

“काही लोक मोफत प्रवास देण्याला विरोध करत आहेत. परंतु मी पैसा चोरी करून घरी नेत नाही किंवा स्विस बँकांमध्येही टाकत नाही. त्यामुळेच हे शक्य झाले आहे,” अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांनी बोलताना दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी बसेससोबतच दिल्ली मेट्रोमध्येही महिलांना मोफत प्रवासाची मुभा देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याची टीका सर्व स्तरातून करण्यात आली होती.

पंरतु आता केजरीवाल यांनी सराकरी बसेसमध्ये मोफत प्रवास सुरू करण्याच्या तारखेचीही घोषणा केली आहे. यापूर्वी केजरीवाल यांनी केलेल्या घोषणेनंतर डीएमआरसीने यासाठी 8 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे म्हटले होते.
केजरीवाल यांनी दिल्लीतील शाळांच्या परिस्थितीवरही भाष्य केलं. सरकारी शाळांमध्ये आता देशभक्तीचेही शिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.