News Flash

Corona : मृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार, तर मुलांना मोफत शिक्षण, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा!

दिल्ली सरकारने करोना काळात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये देखील करोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढते आहे. दिल्लीमध्ये निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे काही रुग्णांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. त्यातच, करोनामुळे होणाऱ्या मृतांचा आकडा वाढू लागलेला असताना दिल्ली सरकारने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. “करोनामुळे जर कुणाचा मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी देण्यात येईल. तसेच, ज्या विद्यार्थ्यांचे पालक करोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत, त्यांना वयाच्या २५व्या वर्षापर्यंत महिना २५०० रुपये पेन्शन आणि मोफत शिक्षण दिलं जाईल”, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. त्यामुळे आपल्या आप्तस्वकीयांना करोनामध्ये गमावलेल्या व्यक्तींना, विशेषत: पालक गमावलेल्या मुलांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील घोषणा केली. “करोनामुळे सदस्य गमावलेल्या प्रत्येक कुटुंबाला ५० हजार रुपयांचा मदतनिधी दिला जाईल. त्यासोबतच, ज्या कुटुंबांमध्ये कमावत्या व्यक्तीचं निधन झालं आहे, त्या कुटुंबाला ५० हजार रुपये मदतनिधीसोबतच महिना २५०० रुपये पेन्शन स्वरूपात दिले जातील. यामध्ये जर पतीचं निधन झालं असेल, तर ही पेन्शन पत्नीला मिळेल. जर पत्नीचं निधन झालं असेल, तर पेन्शन पतीला मिळेल. जर एखाद्या अविवाहित व्यक्तीचं निधन झालं तर ही पेन्शन पालकांना मिळेल”, असं केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

 

मुलांना मिळणार मोफत शिक्षण!

दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांचं करोनामुळे निधन झालं आहे, अशा विद्यार्थ्यांच्या पूर्ण शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार उचलणार असल्याचं केजरीवाल यांनी यावेळी जाहीर केलं. यासोबतच, एका पालकाचं आधीच निधन झालेलं असताना दुसऱ्या पालकाचं करोनामुळे निधन झाल्यास अशा विद्यार्थ्यांचा देखील या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा विद्यार्थ्यांना वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत दिल्ली सरकारकडून २५०० रुपये प्रतिमहिना पेन्शन स्वरूपात दिले जातील. यासोबतच, त्यांच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च दिल्ली सरकारकडू केला जाईल, असं देखील केजरीवाल यांनी यावेळी जाहीर केलं.

 

सोमवारी दिवसभरात दिल्लीमध्ये ४ हजार ५२४ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. ५ एप्रिलपासून म्हणजेच गेल्या दीड महिन्यानंतर ही सर्वात कमी रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 6:55 pm

Web Title: delhi cm arvind kejriwal announcement on ex gratia help to families with corona death pmw 88
टॅग : Corona,Coronavirus
Next Stories
1 दिलासादायक! देशात एका दिवसात ४,२२,४३६ रुग्णांची करोनावर मात
2 “खोटं बोलण्यात वेळ घालवू नका, लोकांचे जीव वाचवा”; टूलकिटवरुन प्रियांका गांधीची टीका
3 उत्तर प्रदेशात मृतदेह जाळण्यासाठी पेट्रोल, टायर वापरल्याने ५ पोलीस निलंबित
Just Now!
X