News Flash

‘मी माझ्या आईला रांगेत उभे केले नसते’, मोदींवर केजरीवाल बरसले

मोदींनी बिर्ला समुहाकडून २५ कोटी घेतल्याचा गंभीर आरोपही केजरीवाल यांनी केला आहे.

दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर उद्योग समुहाकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला.

नोटा बदलून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री मंगळवारी बँकेत गेल्या होत्या. यावरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मोदींवर बरसले आहेत. ‘मी माझ्या आईला कधीच रांगेत उभे केले नसते, मी स्वतः रांगेत उभं राहण्यासाठी गेलो असतो’ अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.
पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयोवृद्ध आई मंगळवारी सकाळी बँकेत गेल्या होत्या. सर्वसामान्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते, सरकारला याचे भान नाही अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. पण आता पंतप्रधानांच्या वयोवृद्ध आईदेखील बँकेत गेल्याने टीकाकारांचे तोंड बंद झाले होते. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरुन मोदींवर निशाणा साधला. मोदींनी राजकारणासाठी आईला रांगेत उभे करुन चांगले केले नाही अशी टीका केजरीवाल यांनी केली.
दरम्यान, मंगळवारी दुपारी दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशनही पार पडले. या अधिवेशनातही अरविंद केजरीवाल यांनी मोदींवर गंभीर आरोप केले आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना बिर्ला समुहाने मोदींना लाच दिली होती असा गंभीर आरोप त्यांनी केला. एका नोंदीमध्ये गुजरात सीएम – २५ कोटी रुपये असा उल्लेख होता असा दावाच त्यांनी केला आहे. नोटबंदीमुळे देशभरात दहशत निर्माण झाली असून सरकारने गरीबांवर वार केला अशी टीका त्यांनी केली. या अधिवेशनात नोटबंदीच्या निर्णयाच्या विरोध करणा-या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.
भाजप आमदार विजेंदर गुप्ता यांनी कामकाजादरम्यान गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मार्शलना बोलवत विजेंदर गुप्ता यांना सभागृहाबाहेर काढले.

Next Stories
1 प्राप्तीकर चुकवेगिरीप्रकरणी काँग्रेसच्या अभिषेक सिंघवींना ५६ कोटींचा दंड
2 पिंडदानाच्या विधीलाही नोटबंदीचा फटका
3 ‘लवकरच २०, ५०च्या नोटांचेही होणार वितरण, नोव्हेंबरअखेरपर्यंत सर्व सुरळित’
Just Now!
X