भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कौतुक केले आहे. ट्विटरद्वारे केजरीवाल यांनी भारतीय वायुसेनेच्या वैमानिकांना सलाम ठोकला आहे. भारतीय वायुसेनेच्या शूर वैमानिकांना माझा सलाम, तुमच्यामुळे आज अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळाला अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवालय यांनी दिली आहे.


दरम्यान, भारतीय वायुसेनेच्या धडाकेबाज कारवाईचं सर्वच स्तरांतून कौतुक होतंय. नेटिझन्सकडून ‘हाऊज द जैश… डेड सर’ असा हॅशटॅग ट्रेंड करुन ट्विटरवर आनंद व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, शिवसेनेनेही भारतीय वायुसेनेचं अभिनंदन केलं आहे. पण अभिनंदन करतानाच, जैशच्या सैतानाला – अझर मसूदला मारल्याशिवाय बदला पूर्ण होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

भारताकडून दुजोरा –
इंडियन एअर फोर्सने पीओकेमधील बालकोट येथे हवाई हल्ला करुन जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा तळ नष्ट केला आहे. या कारवाईत मोठया संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. देशाच्या वेगवेगळया भागत आत्मघातकी दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी बालकोटमधील जैशच्या तळावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते. त्यासाठी आत्मघातकी हल्लेखोरांना तयार करण्यात येत होते. खात्रीलायक गुप्तचरांकडून ही माहिती मिळाली होती. त्यामुळे ही कारवाई आवश्यक होती. या कारवाईत भारताने जैशचा सर्वात मोठा तळ उडवला असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. जैशचा म्होरक्या मसूद अझरचा मेहुणा मैलाना युसूफ अझहर हा कॅम्प चालवत होता. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारत पूर्णपणे कटिबद्ध आहे असे विजय गोखले यांनी सांगितले . खासकरुन जैशच्या तळांवरच हा हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्यावेळी सर्वसामान्यांना झळ बसणार नाही याची काळजी घेण्यात आली. जंगलात आतमधल्या भागात हे तळ होते असे विजय गोखले यांनी सांगितले.