दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाचे दोन महिन्यांचे वीज बील ९१,००० रुपये इतके आले आहे. माहिती अधिकार अर्जाच्या उत्तरात ही माहिती समोर आली आहे. पेशाने वकील असलेल्या विवेक गर्ग यांनी माहिती अधिकाराअंतर्गत केजरीवालांच्या सरकारी निवासस्थानाच्या वीज बीलाची माहितीची विचारणा केली. गर्ग यांनी केलेल्या अर्जाच्या उत्तरात दिल्ली प्रशासनाने केजरीवाल यांच्या सिव्हिल लाईन्स येथील सरकारी निवासस्थानाच्या एप्रिल व मे महिन्याच्या वीज बीलाच्या प्रती सादर केल्या. दोन महिन्यांचे वीज बील ९१,००० रुपये आले असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, भाजपच्या वतीने केजरीवालांच्या सरकारी निवास्थानाचे वीज बील १ लाखाच्यावर असल्याचा दावा केला आहे. केजरीवाल यांच्या निवासस्थानी वीजेचे दोन मीटर असून अनुक्रमे ५५,००० आणि ४८,००० रुपये (एकूण १,०३,०००) इतके बील आल्याचे भाजपचे प्रवक्ते प्रवीण कपूर यांचे म्हणणे आहे.