दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गुरुवारी विधानसभेत अत्यंत महत्त्वाच्या विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार असल्याने अवघ्या देशाचे लक्ष त्याकडे लागले आहे. जरी काँग्रेसचा पाठिंबा असला तरीही अल्पमतातील या सरकारला अनिश्चिततेने घेरले आहे.
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष मातीन अहमद यांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली. आम आदमी पार्टीला (आप) पाठिंबा कायम असल्याचे काँग्रेसने जाहीर केले असून त्याबाबत फेरविचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे आमच्याकडून सरकारला कोणताही धोका नाही, असे दिल्ली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदरसिंग लवली यांनी सांगितले.
आपचे २८ आमदार असून ३६ या आवश्यक बहुमतासाठी त्या पक्षाला आठ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. काँग्रेसचे आठ आमदार आहेत.
विश्वासदर्शक ठरावानंतर सत्तारूढ पक्षापुढे विधानसभेचे अध्यक्ष आणि  उपाध्यक्ष निवडण्याचे कठीण काम आहे. आपने एम. एस. धीर यांची अध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली असून भाजपही आपला उमेदवार रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे.