हिंसाचार नियंत्रणात आणल्याबद्दल अमित शहा यांच्याकडून पोलिसांचे कौतुक

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील दंगल पूर्वनियोजित होती. तीनशे दंगलखोर उत्तर प्रदेशातून आणले गेले होते. पण, दिल्ली पोलिसांनी दंगल पसरू दिली नाही, उलट ३६ तासांमध्ये हिंसाचार आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत दिल्ली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले.

लोकसभेत दिल्ली दंगलीवर बुधवारी सहा तास झालेल्या चर्चेला अमित शहा यांनी उत्तर दिले. शहांच्या उत्तराने संतापलेल्या काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्र्यांचे भाषण सुरू असताना सभात्याग केला. दिल्ली दंगलीवर काँग्रेसने चर्चा करण्याची मागणी केली होती. पण, आता उत्तर ऐकण्याचीही सहनशीलता त्यांच्याकडे नाही, असा टोला शहा यांनी लगावला. नितीन गडकरी यांनी, काँग्रेसची ही भूमिका योग्य नसल्याचे सांगत शहांच्या भाषणाचे समर्थन केले.

दंगलीत ५२ भारतीय ठार झाले. त्यात हिंदू-मुस्लिम भेद करणे योग्य नाही. पण, या दंगलीला जबाबदार असलेल्या प्रत्येकाविरोधात मग, तो कोणत्याही धर्माचा असो, त्याला कठोर शिक्षा केली जाईल याची ग्वाही देतो. ऐकीव माहितीवर नाही तर शास्त्रशुद्ध पद्धतीने चौकशी केली जात आहे. दोषींना शिक्षा होणारच, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. मात्र, सबळ पुराव्याशिवाय कोणालाही अटक केली जाणार नाही. निर्दोषांना त्रास दिला जाणार नाही, असेही शहा म्हणाले.

ईशान्य दिल्लीतील लोकसंख्या २० लाख असून दिल्ली महानगरतील १३ टक्के लोक व १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दंगल झाली. ती शहरभर पसरू दिली गेली नाही. हा भाग अत्यंत गजबजलेला असून गल्लीबोळांचा आहे. काही गल्लय़ांमध्ये पोलिसांची गाडीही जाऊ  शकत नाही. या भागांना दंगलीचा आणि गुंडगिरीचाही इतिहास आहे. त्यामुळे दंगल नियंत्रणात अडचणी आल्याचा दावा शहांनी केला.

नुकसानभरपाई वसूल करणार

शहा म्हणाले की, या दंगलीत ५२६ जखमी झाले. ३३१ दुकाने जळाली, १४२ घरे आगीत भस्मसात झाली. मालमत्तेचे नुकसान करणारे कोण हे शोधले जात आहे. त्यांच्याकडून नुकसान भरून घेतले जाईल. त्यांची संपत्तीही जप्त केली जाईल. त्यासाठी उच्च न्यायालयाला पत्र लिहिण्यात आले असून विद्यमान न्यायाधीशांची समिती नेमण्याची विनंती केली असल्याची माहिती शहा यांनी दिली.

आयसिसचा सहभाग?

इस्लामिक दहशतवादी संघटना आयसिसच्या समर्थकांचा दंगलीत हात असल्याचा संशय शहा यांनी व्यक्त केला. आयसिसशी संबंधित दोघांना अटक केली आहे. दंगल घडवण्यासाठी पैसे पुरवले गेले. ते हवालामार्फत आणले गेले असावेत. पैसे पुरवणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत ७०० गुन्हे दाखल झाले असून २६४७ जणांना ताब्यात किंवा अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या चित्रफिती तपासल्या जात आहे. लोकांनी हजारो चित्रफिती पोलिसांना पाठवल्या आहेत. विशेष तपास पथकाद्वारे चौकशी केली जात आहे. चेहरामापनाच्या संगणकीय यंत्रणेद्वारे दंगल घडवणाऱ्यांची तोडओळख केली जात असून ११०० लोकांची ओळख पटली आहे. २२-२६ फेब्रुवारी या काळात ६० समाजमाध्यम खाती उघडली गेली व बंद झाली. त्यांचा शोध घेतला जाईल. पोलिसांची ४० पथके तयार केली असून संशयितांना अटक केली जात आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

डोभाल यांना मीच पाठवले!

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना दंगलग्रस्त भागांमध्ये पाहणी करण्याची सूचना मीच केली होती, असे सांगत दंगल नियंत्रणाचे काम गृहमंत्रालयानेच केल्याचा दावा शहांनी केला. ट्रम्प यांच्या दिल्ली दौऱ्यातील एकाही कार्यक्रमात आपण सहभागी झालो नाही. सातत्याने पोलिसांच्या बैठका घेत होतो व परिस्थितीवर लक्ष ठेवून होतो, असे सांगत, दंगलीकडे गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्याचे आरोप शहा यांनी फेटाळले.