पक्षानं राहुल गांधी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी तत्काळ निवड करावी, असा ठराव दिल्ली काँग्रेसनं रविवारी मंजूर केला. दरम्यान, जून २०२१ पर्यंत राहुल गांधी यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होईल, असं देशातील या सर्वात जुन्या पक्षाकडून नुकतचं जाहीर करण्यात आलं होतं.


दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले, “राहुल गांधी हे एकमेव नेते आहेत जे काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करु शकतात. शेतकऱ्यांचे प्रश्न ते आजारी पडलेली जीएसटीची व्यवस्था याबाबत त्यांनी वर्तवलेल्या शंका आता खऱ्या ठरत आहेत. त्यांनी त्यांची नेतृत्व क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांनाच पुन्हा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी आम्ही ठराव मंजुर केला”

देशातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणुका घेण्याला काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनं मंजुरी दिली आहे. कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुका घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यांत काँग्रेसच्या २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षांतर्गत निवडणुका घेण्याबाबत सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं होतं. यामध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भुपिंदर हुडा, पृथ्वीराज चव्हाण, कपिल सिब्बल, मनिष तिवारी आणि मुकुल वासनिक यांचा यामध्ये समावेश होता.

दरम्यान, सोनिया गांधी यांनी गेल्या महिन्यांत या पत्र लिहिणाऱ्या काही नेत्यांची बैठक घेऊन त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत चर्चा केली होती.