बाईकवरून प्रवास करताना हेल्मेट खूप आवश्यक असते. स्वतःची सुरक्षा जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून हेल्मेट वापरण्याची सक्तीही केली जाते. मात्र अनेक बाईकस्वार हेल्मेट न वापरताच गाडी चालवण्यात धन्यता मानतात. हेल्मेट न वापरता बाईक किंवा स्कुटर चालवताना अपघात झाल्यास डोक्याला इजा होण्याची प्रसंगी जीव जाण्याचीही भीती असते. हे घडू नये म्हणूनच हेल्मेट सक्तीही करण्यात आलीये. हेल्मेट घातले नाही तर पोलीस कारवाईही करतात. मात्र राजधानी दिल्लीत असा एक पोलीस आहे जो विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्यांना हेल्मेट गिफ्ट करतो.

लोक स्वतःच्या सुरक्षेबाबत गंभीर नसतात म्हणून बाईक किंवा स्कुटर चालवताना ते हेल्मेट वापरत नाहीत. संदीप कुमार नावाचा हा पोलीस त्यांना अडवतो. गाडी बाजूला घ्यायला सांगतो. हेल्मेट का महत्त्वाचे आहे ते पटवून सांगतो ते त्या माणसाला पटले आणि त्याने यापुढे हेल्मेट वापरण्याचे वचन दिले तर संदीप कुमार नावाचा हा पोलीस हवालदार त्या माणसाकडून दंड घेण्याऐवजी त्याला हेल्मेट गिफ्ट करतो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

हेल्मेटसक्तीचा नियम मोडणाऱ्या बाईकस्वारासाठी खरे तर हा सुखद धक्का असतो. मात्र संदीपने राबवलेल्या या उपक्रमाचे दिल्लीत कौतुक होते आहे. वाहतूक पोलिसांकडे ‘नियमांमध्ये अडकवणारा माणूस’, ‘पावती फाडणारा’ ‘मामा’, ‘चिरीमिरी घेणारा माणूस’ अशी विशेषणे लावूनच पाहिले जाते. मात्र ही विशेषणे पुसण्याचे काम आणि सुरक्षेच्या दृष्टीने अनोखा उपक्रम राबवण्याचे काम संदीप करतो आहे.

एवढेच नाही भाऊबीज, रक्षाबंधन, वाढदिवस अशा कार्यक्रमांना जेव्हा संदीप जातो तेव्हाही तो त्या घरातल्या मुलांना हेल्मेटच गिफ्ट करतो. दिल्लीत त्याने अनेक मुलांना हेल्मेट गिफ्ट केली आहेत. तर बिहारमधील छपरा गाव तर असे आहे जिथे अभावानेच एखादा बाईकस्वार मिळेल ज्याच्याकडे संदीपने दिलेले हेल्मेट नाही.

स्व सुरक्षेचा मार्ग हेल्मेट न वापरणाऱ्यांना सांगणारा हा दिल्लीचा पोलीस नक्कीच इतरांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या उपक्रमाचे दिल्ली पोलिसांनीही कौतुक केले आहे. हेल्मेटच्या वापराचे महत्त्व लोकांना सांगण्यासोबतच आता संदीप कुमार ‘कार चालवत असताना मोबाईलवर न बोलणे’, ‘सीटबेल्टचे महत्त्व कारचालकांना समजावून सांगणे’ यासाठी काय शक्कल लढवता येईल याचा विचार करतो आहे. संदीप कुमारने आपल्या वागण्यातून पोलीस दलाची प्रतिमा बदलण्याचा हा प्रयत्न निश्चितच वाखाणण्याजोगा आहे.