दिल्लीमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने तरुणीला मारहाण केल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडीओत तरुण अत्यंत क्रूरपणे तरुणीला मारहाण करत असल्याचं दिसत होतं. यानंतर पोलिसांनी कारवाई करत तरुणाला अटक केली. मात्र तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, व्हिडीओत दिसत आहे फक्त तितकंच त्या ठिकाणी झालं नाही. मारहाण करण्याआधी वॉशरुममध्ये माझ्यावर बलात्कार करण्यात आला असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. धक्कादायक म्हणजे, बलात्कार होताना देखील त्याच्या मित्राने व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं होतं.

घटनेनंतर तरुणी धक्क्यात होती. मात्र त्यातून सावरत तिने रोहित तोमरविरोधात तक्रार दाखल केली. तरुणीने केलेल्या तक्रारीच्या आधार पोलिसांनी रोहित तोमरला अटक केली असून त्याच्या वडिलांचं निलंबन करण्यात आलं आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पीडित तरुणीने नेमकं काय झालं होतं यासंबंधी माहिती दिली आहे.

रोहित तोमरसोबत तरुणीचे तीन वर्ष प्रेमसंबंध होते. या घटनेनंतर त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. ‘२ सप्टेंबरला रोहितने माल फोन करुन उत्तम नगर येथील बीपीओत येण्यास सांगितलं. मी वारंवार त्याला नकार देत होते. त्याच्याशी बोलत असताना मला अनेक गोष्टी समजल्या. जेव्हा मी विरोध केला तेव्हा त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली’, अशी माहिती तरुणीने दिली आहे.

‘रोहित आणि मी तीन वर्षांपासून एकत्र होतो. एका कॉमन मित्रामुळे आमची भेट झाली. त्याने मला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. २ सप्टेंबरला त्याचा मित्र अली हसनने मला दुसऱ्या मुलीबद्दल सांगितलं. सुरुवातीला त्याने सर्व आरोप फेटाळले. मी त्याला दोघींपैकी एकीचीच निवड कर असं सांगितलं. मी जेव्हा जाण्यास निघाली तेव्हा त्याने अचानक मला मारहाण करण्यास सुरुवात केली. माझ्यात तेथून पळून जाण्याची ताकद नव्हती. त्याने इतक्या जोरात माझ्या पोटावर लाथ घातली की अजून मला जेवायला जमत नाही आहे. अली हसन हे सर्व रेकॉर्ड करत होता. त्याने थांबण्यास सांगितलं मात्र त्याचा फायदा झाला नाही. मारहाण करण्याआधी त्याने माझ्यावर बलात्कार केला’, अशी माहिती तरुणीने दिली आहे.

तरुणीने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या ट्विटमुळे आपल्याला हिंमत आली असल्याचं सांगितलं आहे. ‘जेव्हा राजनाथ सिंह यांनी माझ्यासाठी ट्विट केलं तेव्हा बोलण्याची हिंमत आली. जर मी शांत राहिले तर आयुष्यभर माझ्यावर अत्याचार होतील हे मला समजून चुकलं होतं. पोलिसांनी मला खूप मदत केली’, असं तरुणीने सांगितलं आहे.