27 November 2020

News Flash

अडीच महिन्यांत ७६ बेपत्ता मुलांचा लावला शोध; महिला पोलिसाचा विशेष बढती देऊन सन्मान

सीमा ढाका ठरल्या 'आऊट ऑफ टर्न प्रमोशन' मिळवणाऱ्या पहिल्या महिला कॉन्स्टेबल

दिल्लीच्या एका महिला हेड कॉन्स्टेबलने केवळ अडीच महिन्यांत ७६ बेपत्ता लहान मुलांचा शोध घेतल्याबद्दल त्यांचा ‘ऑऊट ऑफ टर्न प्रमोशन’ देऊन गौरव करण्यात आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तीन महिन्यांत विशेष बढती मिळवणाऱ्या त्या पहिल्या पोलीस कर्मचारी ठरल्या आहेत.

सीमा ढाका यांना आपल्या कामाच्याप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणासाठी या विशेष बढतीनं गौरविण्यात आलं आहे. दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी बुधवारी ही घोषणा केली. पोलीस आयुक्त श्रीवास्तव यांनी काही महिन्यांपूर्वी पोलिसांसाठी एक प्रोत्साहन योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार, वर्षभराच्या काळात १४ वर्षांखालील ५० पेक्षा अधिक मुलांना वाचवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना ‘आऊट ऑफ टर्न प्रमोशन’ देण्यात येईल, असं म्हटलं होतं. या योजनेच्या निकषांपेक्षा सीमा ढाका यांची कामगिरी अतिउत्कृष्ट ठरली आणि केवळ अडीच महिन्यांत त्यांनी ७६ मुलांची सुटका केली.

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, “समयपूर बादली पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या कॉन्स्टेबल सीमा ढाका यांनी तीन महिन्यांहून कमी काळात ७६ मुलांना वाचवलं. वाचवण्यात आलेल्या ७६ मुलांपैकी ५६ मुलांचं वय हे ७ ते १२ वर्षे आहे. या प्रोत्साहन योजनेंतर्गत केवळ तीन महिन्यांत बढती मिळवणाऱ्या सीमा ढाका या पहिल्या महिला पोलीस कर्मचारी ठरल्या आहेत.” यामुळे हेड कॉन्स्टेबल असलेल्या सीमा ढाका यांची सहाय्यक पोलीस निरिक्षकपदी वर्णी लागली आहे.

ढाका म्हणाल्या, “मी दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा आणि पंजाब या राज्यातील मुलांची सोडवणूक केली आहे. बऱ्याच काळापासून अशा प्रकरणांवर मी काम करत आहे. आपल्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासाठी प्रेरित केले.”

“एक आई या नात्यानं आपल्याला कधीही वाटणार नाही तिचं मूल दूर जावं. त्यामुळेच मुलांना वाचवण्यासाठी मी झपाटल्याप्रमाणं २४ तास काम केलं. ऑक्टोबरमध्ये पश्चिम बंगालमध्ये एका अल्पवयीन मुलीला वाचवणं माझ्यासाठी मोठं आव्हानात्मक होतं. आमच्या पथकाने होडीच्या सहाय्याने दोन नद्या पार करुन एका मुलाचा ठाव-ठिकाणा शोधून काढला. हे मूल हरवल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वी दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी शोध मोहिम सुरु केली होती. त्याचबरोबर आपण अशा मुलांची सुटका केली आहे जे छोट्याशा भांडणानंतर आपल्या घरून पळून जाऊन पुढे ड्रग्ज आणि दारुच्या आहारी गेले होते. यांपैकी बहुतेक मुलं ही रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉपवर सापडले”, अशी माहिती ढाका यांनी दिली.

सीमा ढाका यांना जुलै महिन्यांत करोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना तीन आठवडे क्वारंटाइन रहावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी पुन्हा काम सुरु केलं होतं. सीमा ढाका या २००६मध्ये दिल्ली पोलिसांमध्ये रुजू झाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 2:37 pm

Web Title: delhi cop who rescued 76 kids gets out of turn promotion aau 85
Next Stories
1 UAE ने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं केलं बंद
2 जम्मू-काश्मीर : डीडीसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा हल्ला घडवण्याचा होता दहशतवाद्यांचा कट!
3 ‘तिला’ लग्नापासून रोखणाऱ्या बिझनेसमॅनची हत्या केली, धावत्या राजधानीमधून बाहेर फेकला मृतदेह
Just Now!
X