राजधानी दिल्लीमध्ये सध्या भासू लागलेल्या ऑक्सिजनच्या संकटासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दिल्लीच्या शांती मुकुंद रुग्णालयाने न्यायालयाला सांगितलं की नियोजित प्रमाणापेक्षा कमी प्रमाणात ऑक्सिजन त्यांना पुरवण्यात आला आहे. आणि आता त्यांच्याकडे ऑक्सिजन नाही. उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सांगितलं आहे.

यावर सरकारने उत्तर दिलं की ते त्यांच्या बाजूने पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. शांती मुकुंद रुग्णालयाचं म्हणणं आहे की, त्यांना दररोज ३ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे मात्र त्यांना ३.२ मेट्रिक टन ऑक्सिजन देण्यास मान्यता देण्यात आली. पण त्यापैकी फक्त २.६९ मेट्रिक टन ऑक्सिजन त्यांना मिळाला आहे. सध्या भासणाऱ्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्ण म़ृत्यूमुखी पडत असल्याचंही या रुग्णालयाने सांगितलं आहे. यामुळे आता दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला चांगलंच सुनावलं आहे. न्यायालय म्हणतं, तुम्हाला परिस्थिती हाताळता येत नसेल तर आम्हाला सांगा, आम्ही केंद्र सरकारला सांभाळायला सांगू.

दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. दिल्ली सरकारने बँकॉकवरुन ऑक्सिजनचे १८ टँकर्स मागवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हवाई दलाची विमाने देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

हे टँकर्स यायला उद्यापासून सुरुवात होणार असल्याचं केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. केंद्र सरकारशी यासंदर्भात होणारी चर्चा सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्री केजरीवाल यांनी यावेळी सांगितलं. फ्रान्समधून २१ रेडी टू युज ऑक्सिजन प्लांट्स मागवण्यात आले असून त्यांचा वापर लगेच करता येणार आहे. वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये हे प्लांट्स बसवण्यात येतील अशी माहितीही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली आहे.