द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटय़ूट म्हणजे टेरीचे माजी महासंचालक आर.के.पचौरी यांना जागतिक परिषदेसाठी परदेशात जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यांच्यावर संस्थेतील एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला असून दिल्ली न्यायालयाने त्यांना २१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान चीन व जपानमधील जागतिक पर्यावरण परिषदेला जाण्याची परवानगी दिली आहे.
महानगर दंडाधिकारी शिवानी चौहान यांनी पचौरी यांचा विनंती अर्ज मंजूर केला असून भारतीय दूतावासांना त्यांच्या आगमनाबाबत सूचना देण्यास सांगितले आहे. पचौरी यांच्या वतीने बाजू मांडताना वकील आशिष दीक्षित यांनी सांगितले, की आमच्या अशिलाने या प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य
केले असून त्यांना परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळावी, त्यांना काही बैठकांना उपस्थित राहायचे असून हवामान बदलावर चीनमध्ये व्याख्याने द्यायची
आहेत. तक्रारदार महिलाच्या वकिलांनी पचौरी यांच्या अर्जाला विरोध केला असून त्यांना परवानगी दिली तर ते तपासात सहकार्य करणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली आहे. पचौरी यांच्यावर गंभीर आरोप असून त्यांना देश सोडून जाण्याची परवानगी देऊ नये कारण चौकशीसाठी त्यांचे येथे असणे आवश्यक आहे तसेच त्यांच्यावर अजून आरोपपत्र दाखल व्हायचे आहे.