संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱया दिल्लीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी चार आरोपींना दिल्लीतील जलदगती न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवले. खून आणि सामूहिक बलात्कार या आरोपांमध्ये मुकेश सैनी, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि अक्षयकुमार सिंग यांना न्यायालयाने दोषी ठरवले. दोषींना बुधवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. अतिरिक्त सत्रन्यायाधीश योगेश खन्ना यांनी हा निकाल दिला. या सर्व दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. चारही आरोपींना भारतीय दंडविधान संहितेतील कलम ३०२, ३७६, २६५, ३६६, ३९६, ३९५, ४१२, २०१ आणि १२० नुसार दोषी ठरविण्यात आले आहे.
…असा घडला आरोपी दोषी ठरवण्यापर्यंतचा प्रवास
१६ डिसेंबर २०१२ रोजी रात्री धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी २३ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करून तिला गंभीररित्या जखमी केले होते. तिच्यासोबत असलेल्या मित्रावरही आरोपींनी हल्ला केला होता. जखमी अवस्थेत दोघांना बसमधून फेकून आरोपी पळून गेले होते. पीडित तरुणीवर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आणि नंतर सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, तिचा २९ डिसेंबर २०१२ रोजी सिंगापूरमध्ये मृत्यू झाला.
‘मी तर निर्दोष!’ दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपीचा दावा
संपूर्ण देशात या घृणास्पद कृत्याविरुद्ध असंतोषाची लाट उसळली होती. राजधानी नवी दिल्लीमध्ये तरुणाईने रस्त्यावर उतरून आरोपींना कडक शिक्षा करण्याची आणि देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी गंभीर पावले उचलण्याची मागणी केली होती. या घटनेनंतर दोन दिवसांमध्ये दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपींना राजस्थान आणि दिल्लीतून अटक केली होती.
बालगुन्हेगारास ३ वर्षांची शिक्षा
या घटनेतील मुख्य आरोपी राम सिंह याने ११ मार्च २०१३ रोजी दिल्लीतील तिहार तुरुंगात आत्महत्या केली होती. त्याचबरोबर अन्य एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्याविरुद्ध अल्पवयीन न्याय मंडळात खटला चालवण्यात आला. ३१ ऑगस्ट रोजी अल्पवयीन न्याय मंडळाने संबंधित आरोपीला दोषी ठरवत त्याला तीन वर्षे सुधारगृहात पाठविण्याची शिक्षा सुनावली होती.
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणास गूढ वळण प्रमुख आरोपीची तुरुंगात आत्महत्या