कौटुंबीक हिंसाचार आणि हत्येचा प्रयत्न या आरोपांखाली अटकेत असलेले दिल्लीतील आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना बुधवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. पत्नी लिपिका मित्रा यांनी सोमनाथ भारतींविरोधात कौटुंबीक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.
माझ्यावर करण्यात आलेले आरोप राजकीय स्वरुपाचे असून, त्यामागे भाजपचा हात आहे, असा आरोप सोमनाथ भारती यांनी केला होता. त्यांना जामीन देण्याला दिल्ली पोलीसांनी न्यायालयात विरोध केला. सोमनाथ भारतींना जामीन मिळाल्यास त्याचा या प्रकरणाच्या तपासावर परिणाम होईल, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. मंगळवारी सुमारे अडीच तास जामीन याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी युक्तिवाद करतान सोमनाथ भारती यांचे वकील अॅड. विजय आगरवाल म्हणाले, पती-पत्नीमधील नातेसंबंधांवर आधारित हे प्रकरण आहे. केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे त्याचा मोठा बागुलबुवा करण्यात येतो आहे. या प्रकरणात आपचा विरोधक असलेल्या भाजपचाही हात आहे.
आपण आमदार असून, मतदारसंघातील कामे सांभाळावी लागतात. जरी मला जामीन मंजूर केला तरी मी कुठेही पळून जाणार नाही, असे सोमनाथ भारती यांच्याकडून न्यायालयात सांगण्यात आले.