‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना दिल्ली न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ‘नॅशनल हेराल्ड’ वर्तमानपत्राशी निगडीत वित्तिय  कागदपत्रे दोन आठवड्यामध्ये जमा करण्याचे आदेश दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने नोटीसीमधून दिले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप करत कनिष्ठ न्यायालयात तक्रार दाखल केली होती. आरोपानंतर सोनिया आणि राहुल गांधी न्यायालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच न्यायालयाने त्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये  साक्षीदारांची यादी तसेच हेराल्ड प्रकरणातील कागदपत्रांचे या प्रकरणात काय महत्त्व आहे याची माहिती स्पष्ट नसल्याचे न्यायालयाने यापूर्वी म्हटले होते. त्यामुळे स्वामी यांनी ‘नॅशनल हेराल्ड’  प्रकरणी नव्याने याचिका दाखल केली होती.  त्याची एक प्रत त्यांनी उच्च न्यायालयालाही पाठवली आहे. स्वामी यांच्या याचिकेनंतर सोनिया आणि राहुल गांधी यांना नोटीस बजावण्यात आली असून कागदपत्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा आणि इतरांवर स्वामींकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.