स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटकेत असलेल्या क्रिकेटपटू एस. श्रीशांत आणि अजित चंडिला यांना मंगळवारी ४ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. याच प्रकरणातील आणखी एक आरोपी क्रिकेटपटू अंकित चव्हाण याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला.
श्रीशांत आणि चंडिला यांची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने त्यांना दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात आले. श्रीशांतकडून अजून काही सट्टेबाजांबद्दल आणि स्पॉट फिक्सिंगबद्दल माहिती काढायची असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ करावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली आणि त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. श्रीशांत आणि चंडिला या दोघांनाही आता दिल्लीतील तिहार कारागृहात ठेवण्यात येणार आहे. अंकित चव्हाण याचे दोन जूनला लग्न असल्याने त्याला जामीन द्यावा, अशी मागणी त्याच्या वकिलांनी न्यायालयात केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने चव्हाणच्या जामीनाला विरोध केला. त्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.