दिल्ली विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांना सत्र न्यायालयाकडून शुक्रवारी सहा महिने कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २०१५ मध्ये मनीष घई या बांधकाम व्यावसायिकाच्या घरात बळजबरी घुसण्यासंबधी असलेल्या प्रकरणी त्यांना आरोपी ठरवण्यात आले आहे. तर, दहा हजार रुपायांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीनही मंजूर केला गेला आहे. आता सत्र न्यायालयाच्या निर्णयास उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे, गोयल यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी गोयल यांच्यासह सुमीत गोयल, हितेश खन्ना, अरूल गुप्ता आणि बलबीर सिंह यांना देखील आरोपी ठरवण्यात आले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी ६ फेब्रुवारी २०१५ रोजी स्थानिक बिल्डर मनीष घई यांच्या विवेक विहार येथील घरात गोयल यांनी आपल्या समर्थकांसह बळजबरीने प्रवेश केला होता. आपल्या घरात तोडफोड करण्यात आल्याचा आरोपही घई यांनी गोयल आणि त्यांच्या समर्थकांवर केला होता.