दिल्लीतील सीमापुरी परिसरातील कलंदर कॉलनीत मंगळवारी रात्री मोठ्या जल्लोषात लग्नाची वरात निघाली होती. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पण अचानक झालेल्या गोळीबारामुळे घोडीवर स्वार असलेला नवरदेव खाली पडला. त्याला उचलायला गेल्यानंतर सर्वांच्या लक्षात आले की, नवरदेवाच्याच डोक्याला गोळी लागली. क्षणात वातावरण बदलले. आनंदाचे रूपांतर दु:खात झाले. नवरदेवाला त्वरीत जीटीबी रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण रात्री दोनच्या सुमारास उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

सुरूवातीच्या तपासानुसार वरातीत सहभागी झालेला युवक हवेत गोळीबार करत होता. त्याची एक गोळी नवरदेवाला लागली. आरोपीचा शोध घेतला जात आहे, असे पोलीस उपायुक्त नुपूर प्रसाद यांनी सांगितले. आरोपी हा मृत नवरदेवाचा नातेवाईक आहे. घरातून वरात निघाल्यापासून तो हवेत गोळीबार करत होता. पण एक-दोनवेळा गोळीबार केल्यानंतरची एक गोळी नवरदेवाच्या डोक्याच्या मागच्या बाजूला लागली. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथक नियुक्त केले असून गाझियाबादमध्ये त्याचा शोध घेतला जात आहे.

मृत नवरदेवाचे नाव दीपक (वय २३) असून तो आनंद विहार येथील बस स्थानकावर काम करतो. मंगळवारी रात्री उशिरा त्याच्या घरापासून वरात निघाली होती. फरिदाबाद येथे त्यांना जायचे होते. नवरदेव घोडीवर बसला होता. काही पावले पुढे गेल्यानंतर गोळी लागल्याने तो खाली पडला. डोक्याला मुंडावळया बांधल्यामुळे लोकांना काहीवेळ काहीच समजले नाही. मुंडावळया उतरवल्यानंतर गोळी लागल्याचे सर्वांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी लगेचच त्याला रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी लगेचच धाव घेतली. वरातीत सहभागी लोकांची चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांना आरोपीची ओळख पटली.