दिल्लीतील उद्योगपतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना सोमवारी अटक केली. यात एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. मात्र पोलीस तपासादरम्यान हत्या झालेल्या उद्योगपतीने तिन्ही आरोपींना आपल्या हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. मयत उद्योगपतीवर गेली काही वर्ष कर्जाचा डोंगर उभा होता. यातून स्वतःची सुटका करुन घेण्यासाठी व आपल्यानंतर परिवाराला विम्याचे पैसे मिळावे यासाठी उद्योगपतीनेच आपल्या हत्येची सुपारी दिल्याचं निष्पन्न झालं आहे.

९ जूनरोजी उद्योगपती दिल्लीमधील आपल्या आनंद विहार या भागातून बेपत्ता झाला. परिवाराने यासंदर्भात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. १० जून रोजी दिल्ली पोलिसांना बापरोला विहार भागात खेदी वाला पुलाजवळ एका माणसाचा गळफास घेतलेला मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्वरित घटनास्खळी पोहचत मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. यावेळी मृतदेहाचे हात बांधलेले असल्याचं पोलिसांना कळलं. अधिक तपास केला असता तो मृतदेह आनंद विहार भागातून बेपत्ता झालेल्या उद्योगपतीचा असल्याचं पोलिसांना कळलं. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केला.

पोलिसांनी आपल्या नेटकवर्कच्या माध्यमातून मिळवलेल्या माहितीच्या आधारावर एका संशयित आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तपासादरम्यान संशयित आरोपीने उद्योगपतीच्या हत्येत आपला सहभाग असल्याचं कबुल केलं. पोलिसांनी या माहितीवरुन हत्येच सहभागी असलेल्या दोन आरोपींनाही अटक केली. या आरोपींच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीवरुन, खुद्द उद्योगपतीनेच आपल्या हत्येची सुपारी तिघांना दिल्याचं पुढे आलं. या कामासाठी तिघांना पैसेही देण्यात आले होते, आपण गेल्यानंतर परिवाराला विम्याचे पैसे मिळतील असं सांगत आपली हत्या करण्यासाठी पैसे दिल्याचं आरोपींनी पोलिसांसमोर कबुल केलं.