देशभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दिल्ली, मुंबई व पुणे या प्रमुख शहरांमध्ये करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. सर्वसामान्य जनतेपासून करोना योद्ध्यांसह आजीमाजी मंत्री देखील करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया हे देखील करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. त्यांनी स्वतः ट्वटिद्वारे आपला करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगितेल आहे. शिवाय, त्यांनी स्वतःचे विलगीकरण करून घेतले आहे.

“थोडासा ताप आल्यानंतर आज करोना टेस्ट करून घेतली होती. ज्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी स्वतःचे विलगीकरण करून घेतले आहे. सध्या ताप किंवा अन्य कोणताही त्रास नाही. मी संपूर्णपणे ठीक आहे. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनेमुळे मी लवकरच बरा होवून कामावर परतेल.” असं सिसोदिया यांनी ट्विट केलं आहे. या अगोदर दिल्लीमधील तीन अन्य आमदार देखील करोना पॉझिटिव्ह आढळलेले आहेत.

दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी सगळ्या खासदारांची कोविड १९ ची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १७ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.  मीनाक्षी लेखी, अनंतकुमार हेगडे यांच्यासह एकूण १७ खासदारांना करोनाची लागण झाली आहे. या सगळ्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इतर खासदारांमध्ये प्रवेश साहिब सिंह, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वम जी, प्रताप राव पाटिल, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांच्यासह एकूण १७ जणांना करोनाची लागण झाली आहे.