दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना गेल्या आठवड्यात करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं होतं. ताप आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना लोकलनायक जयप्रकाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. १४ सप्टेंबर रोजी करोना पॉझिटिव्ह आढळल्यापासून मनिष सिसोदिया आपल्या निवासस्थानी विलगीकरणात आहेत. करोना रुग्ण ज्यांना इतर कोणतेही त्रास नाहीत तसंच ठराविक वयोगटात नाहीत त्यांना होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

१४ सप्टेंबरला मनिष सिसोदिया यांनी ट्विट करत आपल्याला करोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तसंच आपल्या संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करण्याचं आवाहन केलं होतं.

“ताप आल्यानंतर करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी स्वत:चं विलगीकरण केलं आहे. सध्या तरी मला ताप किंवा इतर कोणता त्रास नाही. मी ठणठणीत आहे. तुमच्या प्रार्थनांसोबत लवकरच बरं होऊ पुन्हा परतेन असा विश्वास आहे,” असं ट्विट मनिष सिसोदिया यांनी केलं होतं.

दिल्लीत मंगळवारी ३८०० नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. यासोबत राजधानीतील रुग्णसंख्या २ लाख ५३ हजारांवर पोहोचली. दिल्लीत आतापर्यंत करोनामुले ५०५१ जणांचा मृत्यू झाला आहे.