दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या ट्वीटवरून दिल्लीचं राजकीय वातावरण आता तापू लागलं आहे. दिल्लीतील आम आदमी पक्षाचं सरकार आणि केंद्रातील भाजपा प्रणीत सरकार यांच्यामध्ये या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. करोनाच्या ‘सिंगापूर स्ट्रेन’चा उल्लेख करणारं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. त्यावर असा कोणताही स्ट्रेन अस्तित्वात नसल्याचं स्पष्टीकरण सिंगापूर सरकारकडून करण्यात आलं होतं. त्यानंतर केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्यामध्ये पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केंद्र सरकारने या मुद्द्यावरून अरविंद केजरीवाल यांना टार्गेट केल्यानंतर आता दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. “केंद्र सरकारला त्यांच्या प्रतिमेची काळजी आहे, पण आम्हाला आमच्या मुलांची चिंता आहे”, असं मनीष सिसोदिया म्हणाले आहेत.

मुद्दा सिंगापूरचा नाहीच!

मनीष सिसोदिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात काही ट्वीट्स करत आपली भूमिका मांडली आहे. “मुद्दा फक्त सिंगापूरचा नाही. मुद्दा आमच्या मुलांच्या सुरक्षिततेचा आहे. आज पुनहा केंद्र सरकार येणाऱ्या संकटाचा अंदाज घेऊ शकत नाहीये. आमच्या मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेजबाबदारपणा दाखवत आहे. केंद्र सरकारला फक्त परदेशात त्यांच्या प्रतिमेची काळजी आहे. आमच्या मुलांची लस कुठे गेली? परदेशात. भाजपा कुणाची बाजू मांडण्यासाठी पुढे आली? परदेशाची. भाजपाला त्यांचं देशप्रेम लखलाभ, पण आम्हाला फक्त आमच्या मुलांची चिंता आहे”, असं या ट्विटमध्ये मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

 

लंडनमध्ये नवा स्ट्रेन सापडला तेव्हाही…

दरम्यान, यावेळी लंडनमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन सापडला, तेव्हाही केंद्र सरकारने दुर्लक्षच केल्याची टीका सिसोदिया यांनी केली आहे. “केजरीवाल यांनी दोन मुद्द्यांचा उल्लेख केला. सिंगापूरचा स्ट्रेन आणि लहान मुलांना धोका. केंद्र सरकारला सिंगापूरची चिंता वाटली आणि केजरीवाल यांना मुलांची. लंडनमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आला, तेव्हाही केंद्र सरकारने तज्ज्ञांनी दिलेला इशारा ऐकला नाही आणि त्यानंतर देशात निर्माण झालेली परिस्थिती सगळ्यांनाच माहिती आहे”, असं सिसोदिया यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

“केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं मत देशाचं मत नाही”, परराष्ट्रमंत्र्यांनी सुनावलं!

काय होतं केजरीवाल यांचं ट्वीट?

“सिंगापूरमध्ये आढळून आलेला करोनाचा नवीन स्ट्रेन लहान मुलांसाठी खूप घातक असल्याचं सांगितलं जात आहे. भारतात हा विषाणू तिसऱ्या लाटेच्या रुपात येऊ शकतो. केंद्र सरकारला माझी विनंती आहे, की सिंगापूरसोबतची हवाई प्रवासी सेवा तत्काळ रद्द करण्यात यावी. लहान मुलांसाठी लसींच्या पर्यायांवर प्राधान्यक्रमाने काम करण्यात यावं”, असं ट्वीट अरविंद केजरीवाल यांनी केलं होतं. त्यानंतर सिंगापूर सरकारने हा दावा फेटाळून लावल्यानंतर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी देखील ट्वीट करून अरविंद केजरीवाल भारताचं मत मांडत नाहीत, असं स्पष्ट केलं होतं.