ज्यांना आंदोलने, निदर्शने करण्याची सवय आहे त्यांना तेच करू द्या. त्यांना सत्तासंचालनाची सवय नाही. ते फक्त अराजक पसरवतात. त्यामुळे स्वत:ला अराजकतावादी संबोधणाऱ्यांमध्ये व नक्षलवाद्यांमध्ये काहीही फरक नसल्याचा घणाघाती हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पक्षाचे संस्थापक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर चढवला. दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी भाजपने दिल्लीच्या रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करून प्रचारात आघाडी उघडली आहे. तब्बल ४७ मिनिटांच्या घणाघाती भाषणात नरेंद्र मोदी यांनी एकदाही अरविंद केजरीवाल वा आम आदमी पक्षाचे नाव घेतले नाही. मात्र भाषणातील दहा मिनिटे मात्र त्यांनी अप्रत्यक्षपणे आपचे नाव न घेता टीका केली.    
दिल्लीतील तब्बल आठशेच्या वर अनधिकृत वस्त्यांना कायदेशीर मान्यता देणारे विधेयक मंजूर केल्याचे मोदी यांनी आपल्या भाषणात आवर्जून सांगितले. मात्र पाणी व विजेच्या दरांवर मोदी बोलले नाहीत. ग्राहकाला आपल्या पसंतीच्या वीज कंपनीला निवडता येईल, अशी व्यवस्था भाजप सत्तेत आल्यास निर्माण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. जो स्वस्त वीज देईल त्या कंपनीकडे ग्राहक वळतील. त्यातून स्पर्धा निर्माण होईल व विजेचे दर आपोआप खाली येतील, असा दावा मोदी यांनी केला. केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून माझ्यावर व्यक्तिश: किंवा सरकारमधील अन्य कुणावरही विरोधकांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला नाही. कारण खरोखरच देश भ्रष्टाचारमुक्त होत आहे. दिल्लीत भ्रष्टाचारमुक्त सरकारसाठी भाजपला मत द्या, असे आवाहन मोदी यांनी केले. केंद्रात सर्वोच्च पातळीवरील भ्रष्टाचार संपला आहे. अगदी स्थानिक पातळीपर्यंत भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था निर्माण करायची आहे. येत्या २०२२ पर्यंत दिल्लीतील प्रत्येक कुटुंबास स्वत:च्या मालकीचे घर मिळेल, या मोदींनी दिलेल्या आश्वासनाला उपस्थितांनी दाद दिली. दिल्लीसाठी स्वतंत्र योजनांची घोषणा न करता केंद्र सरकारने गेल्या सात महिन्यांमध्ये केलेल्या कामकाजांची माहिती सभेत दिली. ते म्हणाले की, बँकांमध्ये गरीब जनता दिसत नव्हती. आता जन-धन योजनेमुळे त्यांनाही बँकेत खाते उघडता येते. मूलतत्त्ववादी विचारांना तिलांजली देऊन जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल मोदी यांनी तेथील जनतेचे आभार मानले. हरयाणात  भाजपला कौल दिल्याबद्दल तेथील जनतेचे मोदी यांनी  समाधान व्यक्त केले.    
महागाई कमी झाल्याचा दावा
भाजपाध्यक्ष अमित शहा म्हणाले की, मोदी सत्तेत आल्यापासून महागाई कमी झाली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने पहिल्या कार्यकाळात शंभर दिवसांत महागाई कमी करून दाखवण्याचे आश्वासन दिले होते. पण दहा वर्षांत एकदाही ते महागाई कमी करू शकले नाहीत. मोदी सत्तेत आल्यापासून सात महिन्यांत दहा वेळा पेट्रोलच्या किमतीत घट झाली. परदेशातील बँकांमध्ये दडवून ठेवलेला काळा पैसा मायदेशी परत आणण्यासाठी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत विशेष तपास पथक उभारल्याचे शहा यांनी नमूद केले.