दिल्लीत फॅशन डिझायनर महिलेची हत्या केल्याची घटना समोर आली असून टेलरिंगचे काम करणाऱ्या तरुणाने महिलेची हत्या केली आहे. कामाचे पैसे थकवल्याच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून फॅशन डिझायनर महिलेच्या घरातील नोकराचीही हत्या करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडाने दिल्लीत खळबळ उडाली आहे.

दिल्लीतील वसंतकुंज येथे माला लखानी (वय ५३) या गेल्या १० वर्षांपासून राहत आहे. त्यांच्या घरात बहादूर हा नोकर होता. माला लखानी या फॅशन डिझायनर असून त्यांचे ग्रीन पार्क येथे बुटिक आहे. बुधवारी रात्री उशिरा माला लखानी आणि बहादूर यांची हत्या करण्यात आली. घरातच दोघांचे मृतदेह आढळले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे फिरवत आरोपींना अटक केली आहे. माला यांच्या बुटिकमध्ये टेलर म्हणून काम करणाऱ्या तरुणानेच दोन मित्रांच्या मदतीने माया यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. माला यांनी त्याचे पैसे थकवले होते आणि यावरुन दोघांमध्ये वाद सुरू होता. बुधवारी रात्री मुख्य आरोपी त्याच्या दोन मित्रांसह माला यांच्या घरी गेला. माला यांनी प्रतिकार केला. हा आवाज ऐकून बहादूर मदतीसाठी धावून आला. यानंतर आरोपींनी आधी माला यांची आणि मग बहादूर यांची हत्या केली. पैशांच्या वादातूनच ही हत्या झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.