दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पार्टीमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. भाजपानं कडवं आव्हान दिल्यानंतरही ‘आप’नं जोरदार मुंसडी मारत मोठा विजय संपादन केला. ‘आप’च्या झाडूसमोर भाजपाला दहा जागांपर्यंतही मजल मारता आली नाही. दुसरीकडं काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा दिल्लीच्या मतदारांनी हद्दपार केलं. या दारूण पराभवानंतर काँग्रेसवर टीका सुरू झाली असून, प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना नवा पर्याय सूचवला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणूकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. ‘आप’नं पुन्हा एकदा भाजपा आणि काँग्रेसला आस्मान दाखवलं. भाजपाला दहा जागांच्या आत रोखत आपने पुन्हा साठापेक्षा अधिक जागा मिळवल्या. तर आपच्या वादळात काँग्रेस निकाल बाहेर फेकली गेली. सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला खातं उघडता आलं नाही.

मानहानीकारक पराभवावरून लेखक चेतन भगत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना नवंं नेतृत्व सुचवत सल्ला दिला आहे. चेतन भगत यांनी यासंदर्भात राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळत ट्विट केलं आहे. “”काँग्रेसचे देशभरातील काही नेते अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व का स्वीकारत नाही. सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाकडं इतक काय चांगलं आहे? कोणत्या पक्षामुळे तुमचं करिअर अधिक सुधारणार आहे, घसरत चाललेल्या कि विस्तारत जाणाऱ्या? याचा विचार करा,” असा सल्ला भगत यांनी दिला आहे.

काँग्रेसनं पराभव स्वीकारला –

निकालानंतर जनतेनं दिलेला जनादेश मान्य असल्याचं सांगत काँग्रेसनं पराभव स्वीकारला आहे. “या पराभवानं काँग्रेस हाताश झालेली नाही. यापुढील काळातही काँग्रेस दिल्लीच्या विकास लक्ष ठेवेल. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षासाठी खूप कष्ट घेतले. तरीही अपयश आलं. मात्र, प्रत्येक निवडणूक शिकवत असते. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये या पराभवामुळे नाराजी नाही,” असं काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.