दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी सायंकाळी साडेपाच पर्यंत ६६ टक्के मतदारांनी हक्क बजावला. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणावर मतदान झाल्याने ‘सत्ताविरोधी लाट आली’ हा पारंपरिक समज यंदाही खरा होण्याची शक्यता आहे. वाढलेली टक्केवारी जशी ऐतिहासिक आहे तशीच भाजप व काँग्रेसव्यतिरिक्त आम आदमी पक्षाच्या रूपाने तिसरा पर्याय दिल्लीकरांसमोर आला, तोदेखील पहिल्यांदाच. याशिवाय निवडणूक आयोगाने जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला होता. इतकेच नव्हे तर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अप यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातूनदेखील प्रत्येक राजकीय पक्षाने प्रचारात आघाडी घेतली.
    सन १९९३ साली झालेल्या निवडणुकीत एकूण ६१.७५ टक्केमतदान झाले होते. त्या वेळी भारतीय जनता पक्षाने मदनलाल खुराना यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली. पाच वर्षांच्या कालावधीत भाजपने तीन मुख्यमंत्री बनवले.  १९९६ साली साहेबसिंह वर्मा तर १९९८ साली सुषमा स्वराज यांच्या हाती नेतृत्व देण्यात आले. दिल्लीत कधीही सत्तासंचालनाचा अनुभव नसल्याने नवखेपणातच हरखून गेलेल्या भाजपला १९९८ साली काँग्रेसने पराभूत केले.
१९९८ साली ४८.९९ टक्के मतदान झाले व शीला दीक्षित यांनी सत्ता स्थापन केली. २००३ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढून ५३.४२ टक्क्य़ांपर्यंत पोहोचली व शीला दीक्षित दुसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. २००८ मध्ये ५७.५८ टक्के मतदारांनी मतदान करून पुन्हा शीला दीक्षित यांनाच संधी दिली. १९९३ ते २००८ या कालावधीत झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सरासरी तीन ते चार टक्क्यांनी वाढली. यंदा मात्र मतदारराजाने सारेच रेकॉर्ड ब्रेक केले. विशेष बाब म्हणजे २००८ साली काँग्रेस व भाजपला मिळालेल्या एकूण मतांमध्ये चार टक्क्यांचा फरक होता.

दिल्लीच्या मतदानात ‘महिलाराज’
मतदानात महिलांचा सहभाग मोठा असल्याचे दिसून आले. अनेक मतदान केंद्रांवर महिलांच्या मोठमोठय़ा रांगा दिसत होत्या. काही मतदान केंद्रांवर तर महिलांच्या मतदानाची आकडेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.दक्षिण दिल्लीतील आर. के. पूरम, मालविया नगर, छतरपूर आणि तुघलकाबाद या मतदारसंघांतील अनेक मतदान केंद्रांवर मोठय़ा प्रमाणात महिला दिसत होत्या. आर. के. पूरम मतदारसंघात आम आदमी पक्षाने शाझिया इल्मी या महिलेलाच उमेदवारी दिली आहे. ‘‘अनेक मतदान केंद्रांवर महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून मतदान करत होत्या. अनेक तरुणींनी तर पहिल्यांदाच मतदान केले. त्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता,’’ असे इल्मी यांनी सांगितले. छतरपूर मतदारसंघात तर पुरुष मतदारांपेक्षा अधिक महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गेल्या वर्षभरापासून दिल्लीमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याबरोबरच वाढत्या महागाईने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. महिलांच्या अनेक समस्या असल्याने त्यांना वाचा फोडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात महिलांचे मतदान झाल्याचे म्हटले जात आहे.

कलामांना फटका
मतदान यंत्रातील बिघाडाचा फटका माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना बसला. नवी दिल्ली मतदारसंघातील के. कामराज मार्ग येथील मतदान केंद्रावर गेले असताना त्यांना काही काळ थांबून तासाभराने पुन्हा यावे लागले मतदान यंत्रातील बिघाडामुळे औरंगजेब मार्गावरील मतदान केंद्रावर तासभर उशिरा मतदान सुरू झाले. या मतदान केंद्रावर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे लालकृष्ण अडवाणी, त्यांची मुलगी प्रतिभा आणि सुनीलभारती मित्तल यांनी मतदान केले.

दिल्लीत पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा प्रमाणावर मतदान झाले. निवडणूक आयोगाने राबवलेल्या जनजागृती अभियानामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली, असा दावा राज्य निवडणूक आयोगाने केला. सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत मतदानाची वेळ होती. मात्र मुदत संपली त्यावेळी राज्यात ८० हजार मतदार रांगेत होते. त्यामुळे मतदानाची वेळ सव्वासातपर्यंत वाढवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. रात्री उशीरापर्यंत हाती आलेल्या वृत्तानूसार मतदान शांततेत पार पडले.राज्यातील अकरा हजार मतदान केंद्रापैकी ६३० केंद्रे संवेदनशील घोषीत करण्यात आली होती. सत्तर जागांसाठी ८१० मतदार निवडणूक रिंगणात होते. मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरोधात मैदानात असलेले आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल व विजय गोयल यांनी सकाळी सव्वाआठ वाजता नवी दिल्ली मतदारसंघातील हनुमान रस्त्यावरील केंद्रात मतदान केले. प्रत्येक मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाची करडी नजर होती. दर दोन तासांनी परिस्थितीचा आढाव घेतला जात होता. राज्य निवडणूक अधिकारी विजय देव यांनी याबाबत माहिती दिली.