राजधानी दिल्लीतील राजकीय अस्थिरता दूर होण्याची तिळमात्रही शक्यता नाही. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पक्षाने सरकार न स्थापण्याचा निर्णय आज विजयी उमेदवारांच्या बैठकीनंतर घोषित केला. आम आदमी पक्षाला सत्तास्थापनेसाठी बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी दर्शवली आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ही शक्यता नाकारली. शिवाय आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ‘ना भाजपला पाठिंबा देणार, ना कुणाकडून पाठिंबा घेणार’, असे सांगत सावध भूमिका घेतली आहे.
भाजप व आम आदमी पक्षाच्या भूमिकेमुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होण्याची दाट शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत नायब राज्यपाल नजीब जंग सर्वाधिक जागाजिंकणाऱ्या भाजपला चर्चेसाठी बोलवतील. मात्र नायब राज्यपालांनी निमंत्रित केले तरी सत्ता स्थापन करायची नाही, असे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनीदेखील भाजप सत्तास्थापनेसाठी उत्सुक नसल्याचे सांगितले. भाजपच्या विजयी उमेदवारांना पुन्हा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. सरकार स्थापन केले तरी आम आदमी पक्षाच्या कार्यशैलीमुळे पुढील पाच वर्षे काम करणे अवघड होईल. त्यापेक्षा पुन्हा निवडणूक परवडली, अशी चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे. भाजप भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली होती. त्यावर राज्यसभेतील उपनेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, आम आदमी पक्षाचे नेते अत्यंत अहंकारी आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढच्या जनतेने भाजपला भरभरून मतदान केले. कुण्या केजरीवाल-प्रशांत भूषण यांच्या कृपेमुळे नाही. त्यामुळे भाजपला भ्रष्टाचारी म्हणण्यापूर्वी केजरीवाल यांनी दहादा विचार करावा. शकील अहमद यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते मौन बाळगून आहेत. आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते जनार्दन द्विवेदी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता वाढली आहे.