करोना विषाणूचा सामना करण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका कामगार व मजुरांना सर्वात जास्त बसला. कामधंद्यासाठी इतर राज्यात अडकलेल्या मजुरांचे या काळात प्रचंड हाल झाले. अखेरीस केंद्र सरकारने या कामगारांना घरी जाण्याची परवानगी देत रेल्वे गाड्यांची सोय केली. मात्र त्याआधीच काही कामगार शेकडो किलोमीटरचा प्रवास करत चालत आपल्या गावाकडे निघाले होते. काही मजुरांना रस्ते अपघातात आपले प्राणही गमवावे लागले. अशा परिस्थितीत दिल्लीजवळील एका शेतकऱ्याने सर्वांसमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. दिल्लीजवळील तिगीपूर गावातले पप्पन सिंह हे मशरुमची शेती करतात. पप्पन यांनी आपल्या शेतात काम करणाऱ्या १० मजूरांना त्यांच्या बिहार येथील घरी जाण्यासाठी चक्क विमानाची तिकीटं काढून दिली आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अवश्य पाहा – कष्टकऱ्यांच्या संयमाची परीक्षा

केंद्र सरकारने देशांतर्गत विमान प्रवासला परवानगी दिली आहे. यानंतर पप्पन सिंह यांनी आपल्या मजुरांना थेट विमानाने पाठवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी सकाळी सहा वाजता या सर्व कामगारांचं विमान दिल्लीवरुन पाटणा शहराच्या दिशेने झेपावणार आहे. “मी कधी विमानाने प्रवास करु शकेन असा विचारही केला नव्हता. मला किती आनंद होतोय हे मी शब्दांतही सांगू शकत नाहीये. पण विमानतळावर केल्यावर काय करायचं यासाठी मला थोडीशी चिंताही होत आहे.” लखिंदर राम या मजुराने इंडिया टुडेला माहिती दिली. ५० वर्षीय लखविंदर राम गेली २७ वर्ष पप्पन सिंह यांच्या शेतात मजूर म्हणून काम करतात. मालकांनी आम्हा १० कामगारांच्या तिकीटांसाठी एकून ६८ हजार रुपये खर्च केले आहेत, याव्यतिरीक्त प्रवासासाठी आम्हाला त्यांनी प्रत्येकी ३ हजार रुपये रोखही दिले, लखविंदर सांगत होता.

हे कामगार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात श्रमिक एक्सप्रेसने बिहारला जाण्यासाठी रवाना झाले होते. मात्र त्यांना गाडीत शिरताच आलं नाही. मी स्वतः यांना गाडीत जागा मिळावी म्हणून प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी आम्हाला अपयशच आलं. शेकडो किलोमीटर चालत आपल्या गावाकडे जाणं हा पर्याय मला माझ्या कामगारांसाठी योग्य वाटला नाही. यासाठीच मजुरांच्या विमान प्रवासासाठी आवश्यक सर्व बाबी पूर्ण करत आपण त्यांना तिकीट काढून दिल्याचं पप्पन सिंह यांनी सांगितलं.