स्पाइस जेटचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) अजय सिंह आणि अन्य सात संचालकांविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीतील पुनित देवन यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

पुनित देवन यांची दिल्लीत सल्लागार कंपनी असून स्पाइस जेटने या कंपनीशी करार केला होता, असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. पुनीत देवन यांचे डिफेन्स कॉलनीत कार्यालय आहे. स्पाइस जेटने आमच्याकडून सेवा घेतली मात्र आम्हाला पैसे दिले नाही, असे देवन यांनी तक्रारीत म्हटले आहे. देवन यांनी या प्रकरणी दिल्लीतील न्यायालयात धाव घेतली होती. अखेर सीएमडी आणि अन्य सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रेटर कैलाश पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सखोल चौकशी केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त विजय कुमार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. तर स्पाइस जेटच्या प्रवक्त्यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावरील आरोप निराधार आणि खोटे आहेत, असे स्पाइस जेटच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. संबंधित तक्रारदारानेच अपहार केला होता, आता तोच व्यक्ती पैसे उकळण्यासाठी खोटी तक्रार दाखल करत आहे. त्याने न्यायालयापासूनही माहिती लपवून ठेवली. स्पाइस जेटने तक्रारदाराच्या कंपनीचे पैसे थकवलेले नाहीत, असे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.