देशात करोना संकट कमी होत असताना ब्लॅक फंगसची दहशत कायम आहे. दिल्लीत ब्लॅक फंगसमुळे एकाचा मृत्यू झाल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे. दिल्लीतील मूलचंद रुग्णालयात १६ मे रोजी ब्लॅक फंगसचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मूलचंद रुग्णालया व्यतिरिक्त दिल्लीतील आणखी काही रुग्णालयात ब्लॅक फंगसची प्रकरणं समोर आली आहेत. यात सर गंगाराम रुग्णालयात ४०, मॅक्स रुग्णलायत २५, एम्समध्ये १५-२० रुग्ण आहेत.

उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये ३७ वर्षीय करोनाबाधित तरुणावर घरीच उपचार सुरु होते. त्यानंतर ब्लॅक फंगसची लक्षणं दिसल्याने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यावेळेस त्याच्या डोळे आणि चेहऱ्यावर सूज होती. डोळे लाल झाले होते आणि नाकातून रक्तस्त्राव होत होता. त्यानंतर चाचणी केली असता त्याला ब्लॅक फंगस झाल्याची माहिती समोर आली. त्यासाठी डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा जीव गेला.

केंद्राच्या ‘या’ निर्णयाबद्दल मला माहिती नव्हती; नितीन गडकरींची जाहीर कबुली

अशी आहेत लक्षणे

म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीसारखा असतो. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरड्या तसेच छातीत देखील होऊ शकतो. डोळ्याच्या वरच्या पापणीला सूज येणे, पापणी खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, दोन वस्तू दिसणे, नाकावर सूज येणे, चेहऱ्यावर एका बाजूने सूज, डोळ्यांमध्ये वेदना, चावताना दात दु:खणे, ही या आजाराची लक्षणे आहेत. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या, मधुमेह असलेल्यांना या नवीन आजाराचा धोका अधिक आहे. करोना काळातील औषधांच्या वापरामुळे रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका संभवतो, अशी माहिती उपस्थित डॉक्टरांनी दिली. लक्षणे आढळल्यास त्वरित उपचारांची गरज असते. अन्यथा एक ते दोन आठवडय़ांत ही बुरशी डोळे आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकते. डोळा, जबडा यासंदर्भात गंभीर परिणाम होऊ शकतात.

आणि भाजपा खासदाराने स्वत: घासून साफ केलं करोना केंद्रामधील शौचालय

त्यामुळे कोविड होऊन गेलेल्या रुग्णांनी त्यांचे तोंड व डोळे यांची तपासणी नियमित करावी. त्यातही ज्यांना मधुमेह असेल त्यांनी तातडीने तपासणी करावी, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.