पत्रकार बरखा दत्त यांना अश्लील फोटो पाठवणे तसेच त्यांना आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. यातील तीन जण हे दिल्लीतील असून एक जण हा गुजरातमधील आहे.

पत्रकार बरखा दत्त यांनी २१ फेब्रुवारी रोजी दिल्ली पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार दाखल केली होती. अज्ञात व्यक्तींकडून सोशल मीडियावर आणि मोबाईलवर अश्लील मेसेज आणि फोटो पाठवण्यात येत असून काहींनी फोन करुन धमकी देखील दिली, असे त्यांनी म्हटले होते. अज्ञातांकडून माझा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला, असे बरखा दत्त यांनी पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास पथक नेमले. या पथकाने तंत्रज्ञानाच्या मदतीने बरखा दत्त यांना अश्लील मेसेज आणि फोटो पाठवणाऱ्या आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणी पोलिसांनी राजीव शर्मा (वय २३), हेमराज कुमार (वय ३१), आदित्य कुमार (वय ३४) या तिघांना दिल्लीतून तर शब्बीर पिंजारी (वय ४५) याला गुजरातमधील सूरत येथून अटक केली आहे.

यातील राजीव शर्मा या तरुणाने खासगी विद्यापीठातून पदवी घेतल्याचे समोर आले आहे. तर हेमराज हा हॉटेलमध्ये शेफ आहे. आदित्य हा खासगी कंपनीत सेल्स विभागात काम करतो. यातील तिघांची जामिनावर सुटका झाली आहे. तर पिंजारीला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता बरखा दत्त यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावर कोणी शेअर केला, याचा पोलीस तपास करत आहेत.

आरोपींना बरखा दत्त यांचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियावरुन मिळाला होता. मात्र, हा मोबाईल क्रमांक ‘एस्कॉर्ट’ सर्व्हिसचा असल्याचे वाटल्याने त्यावर अश्लील मेसेज पाठवले, असे या तरुणांनी पोलिसांना सांगितले.