05 April 2020

News Flash

दिल्ली सामूहिक बलात्कार-हत्या आरोपींना ३ मार्चला फाशी

न्यायालयाने प्रथम आरोपींना २२ जानेवारीला फाशी देण्याचा आदेश जारी केला होता.

दिल्ली सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणातील चारही आरोपींना ३ मार्च २०२० रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्याचा नवा आदेश दिल्ली न्यायालयाने सोमवारी जारी केला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद्र राणा यांनी मुकेशकुमार सिंग (३२), पवन गुप्ता (२५), विनयकुमार शर्मा (२६) आणि अक्षयकुमार (३१) या चारही आरोपींना  फाशी देण्याचा नवा आदेश जारी केला. आरोपींना फाशी देण्याचा आदेश जारी करण्याची ही तिसरी वेळ आहे.

न्यायालयाने प्रथम आरोपींना २२ जानेवारीला फाशी देण्याचा आदेश जारी केला होता. परंतु न्यायालयाने १७ जानेवारीला १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्याचा आदेश जारी केला होता. तथापि, आरोपींचे दाद मागण्याचे कायदेशीर मार्ग शिल्लक असल्याच्या कारणास्तव न्यायालयाने ३१ जानेवारीला फाशीच्या अंमलबजावणीस पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. दरम्यान मुकेश कुमार या आरोपीने,  आपली बाजू अ‍ॅड. वृंदा ग्रोव्हर यांच्याऐवजी रवी काझी मांडतील, असे न्यायालयास सांगितले.

आरोपी पवनकुमार फाशी विरोधात सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करू इच्छित असल्याचे त्याच्या वकिलांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.

फाशीविरोधात ‘क्युरेटिव्ह याचिका’ या शेवटच्या मार्गाचा अवलंब न करणारा आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्जही न करणारा पवनकुमार हा चार आरोपींपैकी एकमेव होता. परंतु आता या दोन्ही मार्गाचा अवलंब करण्याची त्याची इच्छा असल्याचे त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. आरोपी अक्षयकुमारच्या वकिलांनीही तो राष्ट्रपतींकडे नव्याने दयेचा अर्ज करणार असल्याचे न्यायालयास सांगितले.

विनयकुमारचे उपोषण  

आरोपी विनयकुमार तिहार तुरुंगात उपोषण करीत असल्याचे सोमवारी त्याच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. विनयकुमारने तुरुंगात स्वत:ला इजा करून घेतली असून त्याच्या डोक्याला जखम झाली आहे. त्याला तीव्र मानसिक आजार जडला असल्याने अशा अवस्थेत फाशीची अंमलबजावणी केली जाऊ शकत नाही, असेही त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला कायद्यानुसार आवश्यक ती दक्षता घेण्याचे आदेश दिले.

आता तरी फाशी होईल;  पीडितेच्या आईची प्रतिक्रिया

दिल्ली न्यायालयाने दिल्ली सामूहिक बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींना ३ मार्चला फाशी देण्याचा आदेश जारी केल्यानंतर, यावेळी तरी त्यांना फाशी होईल, अशी आशा असल्याची प्रतिक्रिया पीडितेच्या आईने व्यक्त केली. अखेर फाशीच्या आदेशाची अंमलबजावणी होईल, अशी आशा आहे, असे त्या म्हणाल्या. १६ डिसेंबर २०१२ रोजी दक्षिण दिल्लीत २३ वर्षीय तरुणीवर धावत्या बसमध्ये आरोपींनी बलात्कार करून तिची हत्या केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 1:46 am

Web Title: delhi gang rape and murder akp 94
Next Stories
1 शाहीन बाग आंदोलकांशी चर्चेसाठी मध्यस्थ
2 काश्मीरचा विशेष दर्जा काढण्यास विरोध केलेल्या ब्रिटिश खासदारास प्रवेशबंदी
3 ‘सारथी’च्या दोनशे लाभार्थ्यांचे दिल्लीत आंदोलन
Just Now!
X