गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी दिल्लीत धावत्या बसमध्ये एका तरुणीवर पाशवी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणातील चारही दोषींना फाशी होणार की जन्मठेप हे आता शुक्रवारी स्पष्ट होईल. या खटल्यातील चारही दोषींना शुक्रवारी दुपारी अडीच वाजता शिक्षा सुनावण्यात येईल, असे न्यायालयाने बुधवारी दुपारी स्पष्ट केले. न्यायालयाने बुधवारी शिक्षेसंदर्भात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला.  सरकारी वकिलांनी दोषींना फाशी देण्याची मागणी केली. मात्र, आरोपींचे वय लक्षात घेता त्यांना आपले वर्तन सुधारण्याची संधी देण्यासाठी कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी बचाव पक्षाने केली.
गेल्या वर्षी ‘त्या’ तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचे पडसाद देशभर उमटले होते. जनआंदोलनाच्या रेटय़ानंतर दिल्ली पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्यावर येथील जलदगती न्यायालयात खटला सुरू होता. त्यातील रामसिंह या आरोपीने ११ मार्च रोजी तुरुंगातच आत्महत्या केली, तर दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याचे सिद्ध झाल्याने त्याला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुकेश, विनय शर्मा, पवन गुप्ता व अक्षयसिंह ठाकूर या उर्वरित चौघांविरोधात सुनावणी सुरू होती. मंगळवारी जलदगती न्यायालयाने या चौघांनाही बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले.

दोषींवर लावलेले आरोप
* बलात्कार व हत्या
*  अपहरणाचा कट रचणे
*  पुरावे नष्ट करणे
* अपहरण करून हत्या करणे

प्रस्तावित शिक्षा
बलात्कार व हत्येच्या आरोपाखाली दोषींना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

फाशीच द्या : ‘त्या’ पीडितेचे कुटुंबीयही या वेळी न्यायालयात उपस्थित होते. सर्व आरोपींना फाशीच मिळाली पाहिजे, असा आग्रह त्यांनी न्यायालयाकडे धरला.

शिंदेंवर न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप
नवी दिल्ली : दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील एका आरोपीने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप करत अर्ज केला आहे. बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेल्या चौघांची फाशी निश्चित आहे, असे विधान शिंदे यांनी केले होते. त्यांचे विधान न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप असल्याचा आक्षेप आरोपी मुकेशच्या वकिलांनी घेतला आहे. अति. सत्र न्या.योगेश खन्ना यांच्याकडे हा अर्ज दाखल करण्यात आला.