दिल्लीत १६ डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेतील अटकेत असलेल्या एका आरोपीचा सुधारित वैद्यकीय अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने सोमवारी येथील सरकारी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकाला दिले आहेत. सध्या याप्रकरणी सुनावणी सुरू असून आरोपी प्रकृतीच्या कारणामुळे चौकशीसाठी हजर राहत नसल्यामुळे पुढील कारवाई रखडली आहे.
अतिरिक्त सत्र न्या. योगेश खन्ना यांनी लोकनायक रुग्णालयाला याबाबत आदेश दिले आहेत. आरोपी विनय शर्मा न्यायालयासमोर हजर राहत नसल्यामुळे शेवटच्या साक्षीदाराची साक्ष नोंदवण्याचे बाकी आहे. रुग्णालयाने विनयच्या सादर केलेल्या वैद्यकीय अहवालामुळे त्याच्या प्रकृतीची नेमकी परिस्थिती कळत नाही. त्यामुळे या प्रकरणी तातडीने सुधारित सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला दिले आहेत. आरोपी विनय शर्मा याने ताप, तोंडात अल्सर झाल्याची तक्रार केल्यामुळे ४ मेपासून रुग्णालयात उपचार घेत आहे.
न्यायालयाने या प्रकरणात आतापर्यंत ७९ जणांची साक्ष नोंदवली आहे.
मात्र विनय शर्मा हा न्यायालयात उपस्थित राहत नसल्यामुळे शेवटच्या साक्षीदाराची साक्ष अद्याप पूर्ण
झालेली नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही रखडल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.