आरोपीला न्यायासाठी झगडण्याचा पूर्ण अधिकार आहे, यात शंका नसली तरी १६ डिसेंबर २०१२च्या काळरात्री सहा वासनांध नराधमांनी ‘निर्भया’च्या देहाचा कसा पाचोळा केला होता, हे अवघ्या जगाला माहीत असताना आता याच आरोपींनी तिच्या ‘कफना’चा वाद उगाळत खटला लांबवण्याचे प्रयत्न चालविले आहेत.
सिंगापूरहून आलेल्या शवपेटीत ‘निर्भया’चा मृतदेह नव्हताच, असा दावा करीत बचावपक्षाने एअर इंडियाच्या अधिकाऱ्याचीच उलटतपासणी न्यायालयात मंगळवारी सुरू केली. त्या शवपेटीत मानवी अवशेष नव्हतेच तर दुसऱ्याच गोष्टी भरल्या होत्या, असा दावा आरोपींच्यावतीने करण्यात आला. त्यावर या अधिकाऱ्याने सांगितले की, २९ डिसेंबर २०१२ रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिंगापूरहून आलेली ही शवपेटी सीलबंद होती. ती कुणीही उघडली नाही. कागदोपत्री नोंदीनुसार मृतदेहासह या शवपेटीचे वजन १४० किलो होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. या शवपेटीची क्षकिरण तपासणी का झाली नाही, या बचावपक्षाच्या वकिलांच्या प्रश्नावर अशी कोणतीही सोय नसल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हा मृतदेह कोणाच्या ताब्यात दिला गेला, या प्रश्नावर या अधिकाऱ्याने सांगितले की, याच विमानातून या मुलीचे वडीलही सिंगापूरहून आले होते. सर्व कागदपत्रे, मृत्यूचा दाखला तसेच सिंगापूर येथील भारतीय दूतावासाने पाठविलेले पत्र यांची खातरजमा करून ही शवपेटी मुलीच्या वडिलांकडे दिली गेली. शवपेटीतील पार्थिवाचे छायाचित्र सोबत जोडले नव्हते, असेही त्याने सांगितले.या खटल्यात राम सिंग, मुकेश, विनय, अक्षय आणि पवन हे पाच आरोपी आहेत. त्यातील रामसिंगचा तुरुंगात मृत्यू झाल्याने चौघांविरोधात खटला सुरू आहे. सहावा आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याचा खटला बालन्यायालयात सुरू आहे.