दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्याकांड प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या शिक्षेबाबतचा निर्णय बालगुन्हेगार न्याय मंडळाने २५ जुलैपर्यंत राखून ठेवला आहे.अल्पवयीन आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांनी आपापले स्पष्टीकरण सादर केल्यानंतर मंडळाच्या अध्यक्षा प्रधान दंडाधिकारी गीतांजली गोयल यांनी आपला निर्णय राखून ठेवला.
दिल्ली सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडात एक अल्पवयीन गुन्हेगार असून त्याच्याविरुद्धच्या खटल्याची सुनावणी बालगुन्हेगार न्याय मंडळासमोर सुरू आहे.
सदर बलात्कार प्रकरणातील पीडित युवतीचे पालक न्याय मंडळ न्यायालयाबाहेर उपस्थित होते. या प्रकरणातील एकूण आरोपींपेक्षा अल्पवयीन गुन्हेगाराचे वर्तन अतिशय निर्दयी होते, असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. पीडित युवतीच्या पालकांनी अल्पवयीन गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
निमवैद्यकीय शाखेच्या विद्यार्थिनीवर ज्या बसमध्ये बलात्कार करण्यात आला त्या बसमध्ये आपला अशील नव्हताच, असा युक्तिवाद अल्पवयीन आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात केला आणि काही मुद्दय़ांवर स्पष्टीकरणही दिले. त्याला सरकारी पक्षानेही आपले उत्तर दिल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकशीदरम्यान, अल्पवयीन आरोपीने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले आणि त्या गुन्ह्य़ांत सहभाग नसल्याचा दावा केला. आपल्या अशिलाचा या प्रकरणाशी संबंध जोडण्याबाबतचा कोणताही पुरावा मिळाला नाही. त्याचप्रमाणे बसगाडीत त्याच्या बोटांचे ठसेही मिळाले नाहीत, असेही अल्पवयीन आरोपीच्या वकिलांनी न्यायालयास सांगितले.