कागदपत्रे देण्यास तुरुंग अधिकाऱ्यांकडून विलंब?

नवी दिल्ली : दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील चार पैकी दोन दोषींचे वकील असलेल्या ए.पी.सिंह यांनी शुक्रवारी  न्यायालयात एक याचिका दाखल केली असून काही कागदपत्रे देण्यास तुरुंग अधिकारी विलंब करीत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, या प्रकरणातील दोषींचे वकील ए.पी.सिंह यांनी अशा प्रकारे याचिका दाखल करून न्याय प्रक्रियेची थट्टा केली आहे, असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी केला आहे.

अक्षय कुमार सिंह (वय३१) व पवन सिंह (वय२५) या दोघांचे वकील असलेल्या ए.पी.सिंह यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास तुरुंग अधिकारी विलंब करीत असल्याचे नवीन याचिकेत म्हटले आहे. त्यांच्या याचिकेवर शनिवारी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच विनय कुमार  शर्मा (वय२६) व मुकेश सिंह (वय३२) यांच्या फेरविचार याचिका फेटाळल्या होत्या. यातील सर्व चार दोषींना १ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता फाशी देण्याचा आदेश दिल्लीतील न्यायालयाने दिला आहे.

पतियाळा हाऊस न्यायालयात ए.पी.सिंह यांनी याचिका दाखल केली असून त्यानंतर ते एक-दोन दिवसात फेरविचार याचिका दाखल करून फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेप देण्याची विनंती करणार आहेत.

चारही दोषींचे जेवण आहारतज्ज्ञांनी ठरवून दिले आहे. फाशीच्या भीतीने त्यांनी जेवण सोडू नये असे समुपदेशन केले जात आहे.