17 December 2017

News Flash

दिल्ली बलात्काऱ्यांवर खुनाचाही आरोप

दिल्लीत १६ डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये झालेल्या अमानुष सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध दिल्ली

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली | Updated: January 4, 2013 3:16 AM

दिल्लीत १६ डिसेंबर रोजी चालत्या बसमध्ये झालेल्या अमानुष सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील पाच आरोपींविरुद्ध दिल्ली पोलिसांनी साकेत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे हजार पानांच्या या आरोपपत्रामध्ये आरोपींविरुद्ध खुनाच्या आरोपासह नऊ कलमांखाली खटला भरण्यात आला असून ४० साक्षीदारांचीही नावे घालण्यात आली आहेत. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईवर मृत तरुणीच्या पित्याने समाधान व्यक्त केले असून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी सामूहिक बलात्काराव्यतिरिक्त खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, लूट, पुरावे नष्ट करणे आणि अनैसर्गिक कृत्य करण्याच्या आरोपांखाली कलम ३०२, ३०७, ३७६, ३७७, ३६५, ३९४, २०१ आणि ३४ अंतर्गत खटला दाखल केला आहे. आरोपींना अत्यंत कठोर शिक्षा मिळण्यासाठी आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला असून या आरोपपत्रातील तपशील जाहीर करू नये, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपी असून अल्पवयीन मुलाचे आरोपपत्रात नाव घालण्यात आलेले नाही. आरोपपत्राशी संबंधित सर्व दस्तावेज सीलबंद करून न्यायालयात दाखल केला. या प्रकरणी पुढील सुनावणी शनिवारी होणार आहे.
दरम्यान, प्रस्तावित बलात्कारविरोधी कायद्याला आपल्या मुलीचे नाव दिल्यास तो तिचा सन्मान आणि जनभावनेचा आदर ठरेल. त्यात कायदेशीर अडचणी असतील तर सरकारने त्या दूर कराव्या, असे आवाहन पीडित तरुणीच्या पित्याने केले आहे. खटल्याची सुनावणी वेळेत करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

First Published on January 4, 2013 3:16 am

Web Title: delhi gangrape police files chargesheet wants fir sealed victims identity kept hidden and in camera proceedings