दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील तरुणी मृत्युमुखी पडल्यानंतर या प्रकरणातील सहा आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, येत्या तीन जानेवारीला त्यांच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तीन जानेवारीपर्यंत गुन्हेगारांवर आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.
विशेष पोलीस आयुक्त धर्मेद्र कुमार यांनी सांगितले की, त्यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०२ म्हणजे खुनाचा आरोप ठेवला जाईल, सामूहिक बलात्काराचा गुन्हा तर राहीलच. जलद गती न्यायालयात हा खटला चालवला जाणार असून त्यासाठी ख्यातनाम सरकारी वकिलाची नेमणूक केली जाईल. गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन व्हावे अशी आमची इच्छा आहे. सिंगापूर येथील वैद्यकीय पथकाने या मुलीच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून अहवाल तयार केला आहे तो लवकरच प्राप्त होईल.
या देशाचे नागरिक व दिल्ली पोलीस म्हणून आम्हाला घडल्या घटनेबाबत तीव्र दु:ख वाटते. अतिशय रानटी स्वरूपाचा हा गुन्हा होता. या दु:खाच्या क्षणी नागरिकांनी शांतता पाळावी असे आवाहन त्यांनी केले.
या घटनेतील सहा आरोपींवर कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), कलम २०१ (पुरावे नष्ट करणे), कलम ३६५ ( अपहरण), कलम ३७६ (२) (जी) ( सामूहिक बलात्कार), कलम ३७७ (अनैसर्गिक गुन्हा), कलम ३९४ (दरोडय़ाच्या प्रयत्नात जखमी करणे), कलम ३४ (सामूहिक हेतू) यान्वये गुन्हा दाखल केला आहे. राम सिंग, त्याचा भाऊ मुकेश, अक्षय ठाकूर, पवन व विनय अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अटक केलेला सहावा आरोपी हा अल्पवयीन असून त्याचे नाव सांगण्यात आलेले नाही.