मागच्या वर्षी १६ डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायलयातर्फे केंद्र सरकारला नोटिस पाठवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायलयाने पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर महिला आणि शिशु कल्याण मंत्रालयालाही नोटिस पाठवली आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत ‘सक्षम न्यायाधीश’ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. बलात्कारातील एक आरोपी अल्पवयीन असून, त्याच्याविरुद्ध असलेले आरोप गंभीर असल्याने अशी मागणी करण्यात आली होती. आता या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयात ६ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ३१ ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावताना जुवेनाइल जस्टिस बोर्डाने तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात पाठवले होते. मात्र, पीडित मुलीच्या वडिलांना ही शिक्षा मान्य नाहीये. या प्रकरणातील अन्य पाच आरोपींपैकी एकाने कारागृहात आत्महत्या केली होती. तर, चार जणांना फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये चालत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर देशातील आणि परदेशातील मोठ्या रुग्णालयात इलाजानंतर २९ डिसेंबरला पीडित तरूणीचा मृत्यू झाला होता.