या बलात्कार प्रकरणाची उकल करण्यासाठी १०० पोलीस कार्यरत होते मात्र त्यापैकी ८ जणांच्या चमूने अक्षरश दिवसरात्र एक करून या प्रकरणी गुन्हेगारांना कठोरात कठोर शासन होईल हे जातीने पाहिले. पोलीसांच्या कारभाराबद्दल जाहीररित्या सामाजिक आणि राजकीय पातळीला काढले गेलेले वाभाडे आणि दिल्ली पोलीसांवर चहूबाजूंनी होणारी टिका यांच्या पाश्र्वभूमीवर या आठजणांनी पुरावे गोळा करण्याच्या कामी आकाशपाताळ एक केले.
पाच दिवसांत सर्व आरोपींना गजाआड करणे, त्यांच्या डीएनए चाचण्यांसह आवश्यक त्या सर्व चाचण्या करून त्यांच्या विरोधात अवघ्या दोन आठवडय़ांत १००० पानी आरोपपत्र तयार करणे हे काम पोलीसांनी शिताफीने केले. आरोपींमधील अत्यंत क्रूर असा आरोपी ह अल्पवयीन होता. त्याला तीन वर्षे बालसुधारगृहात डांबण्यात आले. अल्पवयीन गुन्हेगारांना होऊ शकणारी ही सर्वात मोठी शिक्षा, ती व्हावी म्हणूनही या पोलीसांनी प्रचंड मेहनत घेतली.
अतिरिक्त पोलीस उपायुक्त पी.एस.कुशवाहा यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक उभारण्यात आले. कबुलीजबाब मिळवणे आणि प्रत्यक्ष तपासातील घटनाक्रम यांच्यात कोणतीही विसंगती निर्माण होऊ न देणे हे खरे आव्हानात्मक होते, असे पोलीसांनी स्पष्ट केले.
आरोपींनी पीडित महिलेचे तसेच तिच्या प्रियकराचे कपडे जाळण्याचा प्रयत्न केला होता. अर्धवट अवस्थेत जळलेले कपडे मिळवून त्यांची डिएनए चाचणीद्वारे खातरजमा करून घेणे, स्वच्छ केलेल्या बसमध्येदेखील ओघळलेल्या रक्ताचे नमुने शोधणे आणि त्यांची डीएनए चाचणीद्वारे तपासणी करणे, ८८ साक्षीदार उलटल्यानंतरही खटल्यातील गुन्हेगारांची बाजू लंगडीच राहिल असे पुरावे गोळा करणे हे काम पोलीसांनी मोठय़ा खुबीने केले.