दिल्लीत गेल्या काही दिवसात करोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. दिल्लीतील करोना रुग्ण वाढीचा दर हा २.५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या २४ तासात १६०० रुग्णांची नोंद झाली आहे. तरीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाउनचा अवधी एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत सलग पाचव्यांदा लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनमुळे करोना रुग्णांच्या घट होत असल्याने अवधी वाढवला आहे. या आठवड्यातील अंदाजानंतर दिल्लीत अनलॉकची प्रक्रिया सुरु केली जाईल असंही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.

दिल्लीत लॉकडाउनचा अवधी एका आठवड्याने म्हणजेच ३१ मे रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. यावेळेसही दिल्लीत मेट्रोवरील निर्बंध कायम असणार आहेत.

दिल्लीत २ कोटी नागरिकांचं लवकरात लवकर लसीकरण करण्याची योजना आखली आहे. ही प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण केली जाईल असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहेत. तसेच त्यांनी लशींच्या तुटवड्यावरून चिंता व्यक्त केली. लस वेळेवर उपलब्ध झाल्या तर तिसऱ्या लाटेपासून वाचू शकतो असंही त्यांनी सांगितलं.

“मला यामागचं कारणच कळत नाहीये”, CBSE परीक्षांवर प्रियांका गांधींची उद्विग्न प्रतिक्रिया!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार देशात मागील २४ तासांत २ लाख ४० हजार ८४२ नवीन करोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ लाख ५५ हजार १०२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांपासून केंद्र आणि राज्य सरकारांच्या चिंतेत भर घालणाऱ्या मृतांच्या दैनंदिन संख्येत कोणतीही घट होताना चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात ३ हजार ७४१ मृत्यूंची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या २ लाख ९९ हजार २२६ वर पोहोचली आहे.