मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा

नवी दिल्ली : करोनासारख्या संकटकाळात दिल्ली सरकारमार्फत चालविण्यात येणाऱ्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये केवळ दिल्लीकरांवर उपचार केले जातील, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी जाहीर केले. त्याचप्रमाणे शहराच्या सीमा सोमवारी खुल्या करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

केंद्र सरकारच्या रुग्णालयांमध्ये अशा प्रकारचे निर्बंध नाहीत, मात्र अन्य राज्यांतून विशिष्ट शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण दिल्लीत आले तर त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेता येऊ शकतील, असेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

करोनासारख्या संकटकाळात शहरातील आरोग्य पायाभूत सुविधांचा वापर केवळ दिल्लीकरांसाठीच करण्यात यावा, अशी सूचना आप सरकारने स्थापन केलेल्या पथकाने केल्यानंतर केजरीवाल यांनी वरील घोषणा केली. केजरीवाल यांनी माध्यमांशी ऑनलाइन संवाद साधला.

करोनाच्या संकटकाळात दिल्लीतील रुग्णालयांमध्ये केवळ दिल्लीकरांवरच उपचार व्हावेत अशी ९० टक्क्य़ांहून अधिक नागरिकांची इच्छा आहे त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.